COVID-19 : आयुर्वेदिक काढ्यावरील ‘संशोधन’ पुर्ण, आता होणार ‘कोरोना’वर मात, 60 रूग्णांवर प्रयोग यशस्वी

लखनौ : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांत लोकबंधू रुग्णालयात कोविड-१९ च्या रूग्णांवर सुरु झालेले संशोधन आता पूर्णपणे यशस्वी झाले आहे. संशोधनात आयुर्वेदिक काढ्याचा उपयोग तीन गटातील रूग्णांवर केला गेला होता, जो पूर्णपणे यशस्वी झाला. आता हा अहवाल इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कडे देण्यास तयार आहे. कोविड-१९ या संसर्गामुळे जगात खूप विनाश झाला आहे.

या आजारावर मात करण्यासाठी राजधानीच्या लोकबंधू राजनारायण संयुक्त रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल असलेल्या काही रूग्णांवर आयुर्वेदिक औषधाचा प्रयोग केला गेला, जो यशस्वी झाला. आयुर्वेदिक औषधाद्वारे रुग्ण बरे झाल्यानंतर केले गेलेले संशोधन पूर्ण झाले आहे. आता इतर कोरोना बाधित रूग्णांवरही याचा प्रयोग केला जाईल, जेणेकरुन रुग्ण लवकर बरे होऊ शकतील.

तीन गटात विभागल्या गेलेल्या रूग्णांबाबत रुग्णालयाचे संचालक डॉ. डीएस नेगी यांनी शुक्रवारी सांगितले की, आयुर्वेदिक चिकित्सक चाचणी अंतर्गत ९० रुग्णांवर याचा प्रयोग केला गेला होता. रुग्णांना ३०-३० च्या तीन गटात विभागले गेले होते. दोन गटातील रूग्णांना आयुर्वेदिक औषधे दिली गेली होती, तर तिसर्‍या गटाला आयुर्वेदिक औषधे न देता सामान्य उपचार केले गेले. आयुर्वेदिक औषध खाणार्‍या दोन्ही गटातील रूग्ण पाच-सहा दिवसात बरे झाले.

या संशोधनासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान उत्तर प्रदेशकडून निधीही देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. संशोधनासाठी सीटीआरआयकडून मान्यता घेण्यात आली होती. सीसीआरएएसच्या मार्गदर्शक सूचनांनुसार औषध वापरण्यापूर्वी आणि नंतर रुग्णांच्या लक्षणांचे मूल्यांकन केले गेले. प्रयोगाच्या यशानंतर आता रुग्णालयात कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक औषधे वापरली जातील.