UP : भाजप नगरसेवकाचा मृतदेह कारमध्ये आढळला, प्रचंड खळबळ

मेरठ: पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशातील एका भाजप नगरसेवकाचा मृतदेह कारमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. मेरठमध्ये कंकरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्थानकाजवळ पार्क केलेल्या कारमध्ये मृतदेहाजवळ गावठी पिस्तुलही सापडले आहे. त्यामुळे पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मुनीष कुमार पवार उर्फ मिंटू (वय 38,रा. कंकरखेडा,श्रध्दापुरी) असे मृत्यू झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत नगरसेवक पवार हे भाजपकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते मेरठमधील वार्ड क्रमांक 40 चे प्रतिनिधित्व करत होते. बुधवारी मध्यरात्री ते आपल्या घरातून कार घेऊन बाहेर पडले होते. गुरुवारी सकाळी पावली खास रेल्वे स्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला उभा केलेल्या कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह नागरिकांना आढळला. याबाबत स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारमधून मृतदेह बाहेर काढला. जवळच पिस्तुल होते. पिस्तुलाची गोळी लागून त्याचा मृत्यू झाला होता. मृताच्या खिशात मिळालेल्या कागदपत्रांवरून मृतदेह नगरसेवक पवार यांचे असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा अंदाज वर्तवला आहे चौकशी केली असता, पवार याने रात्री आपल्या पत्नीला फोन केला होता. आपण आयुष्यात लढताना अपयशी झालो आहोत, असे त्याने पत्नीला फोनवरून सांगितल्याचे समोर आले आहे.