आता भाजपाची सत्ता असलेल्या ‘या’ राज्यात ‘आधार’कार्डला पॉपर्टी लिंक करावी लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकार प्रशासनातील सहजतेच्या सोयीसाठी आधार कार्डचा शक्य तितका जास्तीत जास्त वापर करत असल्याचे काही दिवसांपासून दिसत आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी आधार लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आता याचेच पुढचे पाऊल म्हणजे उत्तर प्रदेशातील सर्व नागरी मालमत्ता मालकाच्या आधार कार्डशी जोडल्या जाणार आहेत. योगी आदित्यनाथ सरकार कर्नाटकच्या धर्तीवर येथे अर्बन प्रॉपर्टीज ऑनरशिप रेकॉर्ड (UPOR) योजना राबविण्याची तयारी करत आहे.

बेनामी मालमत्तेवर कुऱ्हाड मारण्याची तयारी :
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार या योजनेच्या सहाय्याने बेनामी मालमत्ता व इतर मालमत्ता ओळखण्यास मदत होईल आणि नगरपालिकांमधील कर वसुलीही अधिक होईल. त्यामुळे कोणीही आपल्या नावावरील मालमत्ता लपवू शकणार नाही किंवा मालमत्ता करदेखील चुकवू शकणार नाही.

बेकायदेशीर मालमत्ता जाहीर करणार :
सद्यस्थितीत, बहुतेक पालिका संस्थांकडे त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मालमत्तांच्या मालकीचा तपशील नसतो. यामुळे बहुतेक वेळा कायदेशीर वाद उद्भवतात. ही समस्या देखील सुटणार आहे. असे म्हटले जाते की ही योजना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मुख्य आर्थिक सल्लागार के.व्ही.राजू यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे.

आधी या ७ शहरांमध्ये राबविली जाईल योजना :
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या टप्प्यात ही योजना लखनऊ, कानपूर, आग्रा, गाझियाबाद, वाराणसी, मेरठ आणि प्रयागराजमध्ये राबविली जाईल. ही योजना यशस्वीरीत्या राबवण्यासाठी राज्य सरकार भारतीय सर्वेक्षण विभागाकडून तांत्रिक सहाय्य घेईल आणि सेवानिवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल. या समितीत नियोजन, नगर व ग्रामीण विकास, विकास प्राधिकरण आणि महानगरपालिका संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.

visit : policenama.com 

You might also like