26 जून रोजी एकाच वेळी एक कोटी लोकांना रोजगार देऊन रेकॉर्ड बनविणार योगी सरकार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार 26 जून रोजी एकाच वेळी 1 कोटी लोकांना रोजगार देण्याची योजना आखत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक कोटी लोकांना रोजगार देण्यात येणार आहे. ज्या लोकांना नोकरी मिळत आहे, त्यातील पन्नास टक्के लोक हे मनरेगा अंतर्गत नोंदणीकृत असतील. या निर्णयासह, योगी सरकार देशातील पहिले राज्य असेल जे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करेल. मनरेगा व्यतिरिक्त कुशल कामगार म्हणून अनेक उद्योग, कंपन्या आणि आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एकट्या Naredco या रिअल्टर कंपनीने सरकारला एक लाख रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे.

या रोजगार मोहिमेमधून गोंडा, बलरामपूर, आंबेडकर नगर, अमेठी, अयोध्या, आजमगड, बहराइच, बांदा, बस्ती, देवरिया, फतेहपूर, गाजीपूर, गोरखपूर, हरदोई, जालौन, जौनपूर, कौशांबी, खेरी, कुशीनगर, महाराजगंज, मिर्जापूर, प्रतापगड, प्रयागराज, रायबरेली, संतकबीर नगर, श्रावस्ती, सिद्धार्थनगर, सीतापूर, सुलतानपूर, उन्नाव आणि वाराणसी जिल्ह्यांचा समावेश केला जाईल.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन नोकरी देण्याच्या योजनेचा आढावा घेतला. लॉकडाऊन झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच राज्याशी संबंधित अशा कार्यक्रमात भाग घेतील. ते एक कोटी लोकांना रोजगार देतील. उत्तर प्रदेश सरकारजवळ कोट्यवधी स्थलांतरित कामगारांचा संपूर्ण डेटा बँक मॅपिंगसह तयार आहे. या कामगारांना एमएसएमई, एक्सप्रेस वे, महामार्ग, यूपीडीए, मनरेगा इत्यादी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराशी जोडले गेले आहे. आता हा आकडा एक कोटीपर्यंत पोहोचणार आहे. 26 जूनच्या कार्यक्रमात एमएसएमईंना कर्जही दिले जाईल.