UP : ‘लव्ह जिहाद’ विधेयकाला मंत्रिमंडळानं दिली मंजुरी; योगी सरकारने काढला अध्यादेश

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी लग्नासाठी अवैध-रूपांतर कायद्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. राज्य सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लग्नासाठी कपटपूर्ण विवाह करून धर्मांतराच्या घटनांवर बंदी घालण्याच्या कायद्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

कडक कायदे करण्याची गरज असल्याचे सांगत कायदामंत्री ब्रिजेश पाठक म्हणाले होते, “राज्यात सामाजिक पेच आणि दुश्मनी निर्माण होणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ही प्रकरणे वातावरण बिघडवत आहेत म्हणून कठोर कायदा आवश्यक आहे.”

गेल्या महिन्यात जौनपूर आणि देवरिया येथे झालेल्या पोटनिवडणुकांच्या सभांना संबोधित करताना योगी म्हणाले होते की, त्यांचे सरकार ‘लव्ह जिहाद’ला सामोरे जाण्यासाठी कायदा आणेल. अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला होता की, केवळ लग्नासाठी धर्मांतर स्वीकारले जाऊ शकत नाही.

मुख्यमंत्री योगी यांनी कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, “जे लोक नाव लपवतात आणि लेकी-सुनेच्या सन्मानाशी खेळतात, ते सुधारले नाहीत, त्यांचा शेवट निश्चित आहे.” लव्ह जिहादमध्ये सामील झालेल्यांचे पोस्टर्स चौरस्त्यांवर लावण्यात येतील.