उत्तरप्रदेशात साधुंच्या हत्येनंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केला CM योगींना ‘कॉल’, म्हणाले – ‘आमच्या सारखी कडक कारवाई करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पालघरप्रमाणे उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या 2 साधूंच्या हत्येप्रकरणी आता अपत्यक्षरित्या भाजप सरकारवर निशाणा साधण्याची संधी सत्ताधाऱ्यांना आयतीच मिळाली आहे. पालघरमधील हत्याकांडानंतर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. विशेषत: या मुद्यावरून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, या घटनेवरून राजकारण करू नका असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे.

याच काळात उत्तर प्रदेशात झालेली साधूंची हत्येने खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. उत्तर प्रदेशात झालेल्या दोन साधूंच्या हत्येवरून चिंता व्यक्त करत अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत, असे त्यांनी सांगितले. पालघर घटनेनंतर यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता.

उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या संवाद साधताना म्हणाले, ज्या प्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. परंतु कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत नाव न घेता पालघर घटनेवरून सरकारवर टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील अनूपशहर कोतवालीतील पगोना या गावात शिवमंदिरात मागील दहा वर्षापासून साधू जगनदास (वय-55) आणि सेवादास (वय-35) हे राहात होते. सोमवारी रात्री दोघांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. मंगळवारी सकाळी भाविक मंदिरात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या दोन्ही साधूंचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मंदिराच्या आवारात पडल्याचे भाविकांना आढळून आले.