Uttarakhand : Trivendra Singh Rawat यांचा CM पदाचा राजीनामा, उद्या होणार भाजपा आमदार गटाची बैठक

डेहरादून : उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची भेट घेऊन आपला राजीनामा त्यांच्याकडे सोपवला. राज्याचा पुढील सीएम कोण असेल, यावर सध्या सस्पेन्स कायम आहे.

राजीनाम्यानंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांनी म्हटले की, पक्षाने सामुहिक पद्धतीने निर्णय घेतला की, आता अन्य कुणाला तरी संधी पाहिजे. मी कधी विचारही करू शकत नव्हतो की, मला या पदावर काम करण्याची संधी मिळेल, परंतु भाजपाने मला ही संधी दिली. असे केवळ भाजपामध्येच होऊ शकते.

सूत्रांनुसार मुख्यमंत्रीपदासाठी आमदार धनसिंह रावत, राज्यसभा खासदार अनिल बलूनी आणि प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांची नावे या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी लवकरच उत्तराखंड आमदार गटाची बैठक होईल. 2000 मध्ये राज्याच्या स्थापनेनंतर काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी यांच्याशिवाय कोणत्याही मुख्यमंत्र्याने आपला कार्यकाळ अद्याप पर्यंत पूर्ण केलेला नाही.

त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याविरूद्ध त्यांच्याच पक्षाच्या काही आमदारांनी मोर्चा उघडला होता. आमदारांची नाराजी पाहून पक्षाचे उत्तराखंड प्रभारी दुष्यंत गौतम आणि केंद्रीय पर्यवेक्षक रमन सिंह यांना डेहरादून येथे पाठवण्यात आले होते. येथे त्यांनी नाराज आमदारांची बैठक घेऊन त्यांच्या तक्रारी ऐकल्या, ते आमदारांना समजावण्यात अयशस्वी ठरले. यानंतर सीएम त्रिवेंद्र यांनी स्वत: दिल्लीला जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या.

पर्यायांवर विचार करत होते पक्ष नेतृत्व
यानंतर केंद्रीय नेतृत्व पर्यायांवर विचार करत होते. नेतृत्वाच्या समोर चिंता उत्तराखंडचे जातीय समीकरण साधण्यासह पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुका सुद्धा आहेत. पक्ष नेतृत्वाला वाटत होते की, लागलीच स्थिती नियंत्रणात आली नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. यासाठी पीएम नरेंद्र मोदी यांची मंजूरी घेऊन त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याकडून राजीनामा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

2017 मध्ये पक्षाने जिंकल्या होत्या 70 पैकी 57 जागा
उत्तराखंडमध्ये 2017 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. ज्यामध्ये भाजपाने 70 पैकी 57 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 11 आणि अपक्षांना 2 जागांवर विजय मिळाला. या निवडणुकांमध्ये विजयानंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांना सीएम बनवण्यात आले.