सतपाल महाराज यांची पत्नी निघाली ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सर्व प्रयत्न करूनही देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंड सरकारमधील कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांची पत्नी अमृता रावत यांचा कोरोना विषाणूचा अहवाल सकारात्मक आला आहे, त्यांना ऋषिकेशमधील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले आहे. यामुळे त्यांचे पती सतपाल महाराज यांच्यासह संपर्कात आलेल्या 41 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांची पत्नीही माजी मंत्री राहिल्या आहेत, मिळालेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वी अमृता रावत यांची प्रकृती खालावली. हे पाहता शनिवारी सकाळी त्यांची कोरोना चाचणी खासगी लॅबमध्ये घेण्यात आली. संध्याकाळी अहवालात त्या कोरोना पॉझिटिव्ह ठरल्या, हा अहवाल उघडकीस आल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांच्या घराची म्युन्सिपल गल्ली सील करण्यात आली आहे.

उत्तराखंडमध्ये कोरोना रूग्णांची संख्या 727 वर
अतिरिक्त सचिव आरोग्य युगल किशोर पंत यांनी सांगितले की, शनिवारी 11 नवीन रूग्ण आढळल्याने उत्तराखंडमध्ये संख्या 727 वर पोहोचली आहे. शनिवारी देहरादून जिल्ह्यात सात आणि टिहरी येथे चार नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, दूनमधील एकूण रुग्णांची संख्या 171 वर पोहोचली आहे, राज्यात आतापर्यंत एकूण 727 रूग्णांपैकी 102 रुग्ण बरे झाले आहेत. तर 617 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

साथीच्या आजारामुळे आतापर्यंत 4,971 जणांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत देशात सर्वाधिक 7,964 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 265 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह, या साथीच्या आजाराने मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 4,971 पर्यंत वाढली आहे तर संक्रमितांची संख्या 1,73,763 झाली आहे.

संपूर्ण जगात मृतांची संख्या तीन लाख 68 हजारांहून अधिक
तर वर्ल्डोमीटरच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण जगात या विषाणूमुळे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या तीन लाख 68 हजारांपेक्षा जास्त आहे. संसर्ग झालेल्यांची संख्याही 60 लाख 99 हजाराहून अधिक झाली आहे, तर 27 लाखाहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 22 मे पर्यंत, भारतात कोरोना चाचणीचा सकारात्मक दर चार टक्के होता आणि संसर्ग झालेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण जवळपास तीन टक्क्यांपर्यंत आहे. यासोबतच कोरोनाची प्रकरणे 13 दिवसांत दुप्पट होत आहेत, तर संक्रमित लोकांचा रिकव्हरी रेट 40 टक्के आहे.