महाशिवरात्री निमित्त ‘महाकुंभ’ मेळ्यात 22 लाखांचे ‘पवित्र स्नान’; देशभरात महाशिवरात्री उत्साहात सुरु

उत्तराखंड : उत्तराखंडातील हरिद्वार येथे महाशिवरात्रीनिमित्ताने सकाळपर्यंत २२ लाख भाविकांनी गंगा नदीत डुबकी लावून पवित्र स्नान केले. आता काही वेळाने अखंड हे शाही स्नानास सुरुवात होणार आहे. देशभरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यास सुरुवात झाली आहे. महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी हरिद्वारच्या हर की पौडी घाटावर पहाटेच्यावेळी पवित्र स्नानासाठी गर्दी केली होती.

वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराबाहेरील गल्लीत शेकडो भाविकांनी दर्शनासाठी आज सकाळपासून रांगा लावल्या होत्या. मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाळ मंदिरात आज पहाटे पुजारींनी महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिव यांचा अभिषेक केला. त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. गोरखपूर येथील झारखंडी महादेव मंदिरात भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले आहेत.

 

 

 

 

 

देशात सर्वत्र महाशिवरात्री उत्साहात साजरी होत असली तरी राज्यात वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे आज राज्यातील जवळपास सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. त्र्यंबकेश्वर येथील ज्योर्तिलिंग भगवान त्र्यंबकराजाचे मंदिर महाशिवरात्रीला इतिहासात पहिल्यांदाच बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर व परिसरासह शहरात संचारबंदी लागून करण्यात आली आहे. त्यामुळे भगवान शंकराचा प्रकट दिन असताना शिवभक्तांना मात्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेता येणार नाही. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरही आज बंद ठेवण्यात आले आहे.

पुण्यातही ओंकारेश्वर, पाताळेश्वर, येरवड्यातील तारकेश्वर, नगर रस्त्यावरील वाघेश्वर या शिवमंदिरासह शहरातील मंदिरे आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.