चमोलीतील तपोवन धरणाजवळील बोगद्यात अडकलेल्यांसाठी बचाव कार्य सुरुच; 10 जणांचे मृतदेह सापडले, 170 जण अद्यापही बेपत्ताच

जोशीमठ (उत्तराखंड) : चमोली येथील जोशीमठ येथे नंदादेवी हिमशिखराचा हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १० मृतदेह सापडले आहेत. ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाच्या एका बोगद्यात सुमारे १५० जण अडकून पडल्याची भिती व्यक्त केली जात असून बोगद्याच्या बाहेरील राडारोडा काढण्यात बचाव दलाला यश आले आहे. मंदाकिनी नदीची पाण्याची पातळी खाली येण्याची प्रतिक्षा करीत आहेत.

 

 

 

 

 

ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पातील एका बोगद्यात अडकलेल्या १६ जणांना वाचविण्यात आयटीबीपीच्या जवानांना यश आले आहे. या दुर्घटनेत जलविद्युत प्रकल्पातील बोगद्याचा मार्गच पूर्णपणे बंद झाला होता. बचाव कार्यासाठी धावून गेलेल्या इंडो तिब्बत सीमा पोलिसांच्या कर्मचार्‍यांनी कालपासून हा बोगद्याचा मार्ग शोधण्यासाठी खोदण्यास सुरु केली. एक्सवेटर आणि पोकलँड मशीनच्या सहाय्याने त्यांनी बोगद्याजवळील सर्व गाळ, राडारोडा बाहेर काढला आहे. या बोगद्यात आणखी काही लोक अडकून पडले असण्याची शक्यता आहे.

आयटीबीपीचे प्रवक्ता विवेक पांडे यांनी सांगितले की, आमचे पथक दुसर्‍या बोगद्यात बचाव कार्य वेगाने करत आहेत. आमच्या माहितीनुसार या बोगद्यात अजूनही ३० जण अडकून पडले आहेत. ३०० आयटीबीपीचे जवान बोगदा साफ करण्याचे काम करत आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार अजून १७० लोक बेपत्ता आहेत.