लक्झरी बसची दुचाकीला धडक, मायलेकांसह तीन ठार

बार्शीटाकळी (अकोला) : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जात असलेल्या लक्झरी बसची विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील मायलेकांसह तीनजणांचा मृत्यू झाला. हा अपघात आज (बुधवार) दुपारी दीडच्या सुमारास अकोला ते मंगरुपीर मार्गावरील दगडपारवा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ झाला. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी बसची तोडफोड करुन पेटवून दिली.

अनुराधा प्रकाश राठोड, नितीन प्रकाश राठोड (दोहेही रा. दगडपारवा), अस्मिता पवार (वय-१४ रा. दहातोंडा, ता. मुर्तीजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला.

खासगी प्रवासी वाहतुक करणारी बस (एमएच ३७ बी. ६९४९) अकोला येथून मंगरुळपीरकडे जात होती. त्याचवेळी दगडपारवा येथून मयत एका दुचाकीवरुन विरुद्ध दिशेने येत होते. या बसची धडक दुचाकीला बसली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच दगडपारवा येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी खासगी बसची तोडफोड केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी बस पेटवून दिली.

घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव शांत होत नसल्याचे पाहून पोलिसांनी अकोल्याहून अतिरिक्त कुमक बोलावली. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण आहे.