विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; 36 लाख जणांना मिळणार लाभ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार, आता 18 वर्षांवरील सर्वांना एक मेपासून लस दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या सुमारे 36 लाख 870 विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये लस दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आता लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. हे लसीकरण एक मेपासून केले जाणार आहे. त्यानंतर आता राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या सुमारे 36 लाख 870 विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये लस दिली जाणार आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंसोबत महाविद्यालय आणि विद्यापीठीय परीक्षांबाबत उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन लसीकरण

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांना लस मिळणे आवश्यक आहे. हे लसीकरण विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

परीक्षा ऑनलाईनच

राज्य सरकारने महाराष्ट्रातील 13 अकृषी विद्यापीठांच्या उर्वरित सर्व परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनेच घेतल्या जातील, असे जाहीर केले आहे. तसेच विद्यापीठांना आवश्यक त्या सोयी-सुविधा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून पुरवल्या जातील, असेही सामंत यांनी म्हटले आहे.