दिलासादायक ! केंद्राची पुण्यावर कृपादृष्टी; लसींचा पुरवठा होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक केंद्रांवर लसीकरण बंद झाले. त्यामध्ये मुंबई, नागपूर, सातारा आणि आता पुण्यातही लसींचा साठा शिल्लक नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता केंद्र सरकारने पुण्यासाठी 2 लाख 48 हजार लसींचा पुरवठा केला आहे.

केंद्राने केलेल्या लसींमध्ये पुणे जिल्ह्यासाठी हा पुरवठा असणार आहे. त्यामध्ये पुणे शहराला 40 टक्के, ग्रामीणला 40 टक्के आणि पिंपरी-चिंचवडला 20 टक्के लसींची मात्रा मिळणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच येत्या रविवारीही पुणे जिल्ह्याला 1 लाख 25 हजार लसींची मात्रा मिळणार आहे. पुणेकरांना लसीकरण केंद्रावर गेल्यावर लस मिळाली नाही. त्यामुळे या नागरिकांना लस न घेताच माघारी फिरावे लागत होते. मात्र, आता पुणे जिल्ह्याला लसींचा पुरवठा झाल्याने लसीकरण पुन्हा नव्याने सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राज्यात लसींचा तुडवडा असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान केले होते. हा साठा तीन दिवस पुरेल इतकाच शिल्लक असल्याचेही म्हटले होते. तसेच अतिरिक्त लसींचा साठा मिळाला नाही तर लसीकरण बंद पडेल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, आता पुणे जिल्ह्यासाठी लसींचा मोठा पुरवठा झाला आहे.

देशात सर्वाधिक हॉटस्पॉट पुण्यात

देशातील कोरोना हॉटस्पॉटमध्ये पुणे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्याचे संसर्गाचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे लसींची मागणी केली जात होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे.