Kolhapur News : लाचखोर पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

कोल्हापूर: पेठवडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदारकडून ५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. चंद्रकांत श्रीपती भोसले (रा. भोसलेवाडी, कोल्हापूर) असे ताब्यात घेतलेल्या उपनिरिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी विवाहितेचा छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात तक्रारदार यांचे पक्षकारावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी उपनिरीक्षक भोसले याने केली होती. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाच लुचपतने सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना भोसले याला रंगेहाथ पकडण्यात आले.

एसीबीचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक युवराज सरनोबत, सहाय्यक फौजदार बबंरगेकर, शरद पोरे, नवनाथ कदम, सुनिल घोसाळकर या पथकाने ही कारवाई केली.