पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Vadgaon Sheri Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी आता कमी कालावधी आहे. त्यामुळे उमेदवारांची धावपळ सुरु आहे.
मतदारसंघात राजकीय गणितं जुळवण्याचा उमेदवार प्रयत्न करीत आहेत. शहरातील चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे वडगावशेरी. या मतदारसंघात यंदा चुरशीची लढत असणार आहे. त्यामुळे प्रचाराची नवनवी तंत्रे उमेदवारांकडून वापरली जात आहेत.
त्यातच आता वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांना लोहगावचे माजी उपसरपंच प्रीतम प्रतापराव खांदवे-पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. खांदवे-पाटील यांनी पठारे यांना संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा भेट देऊन आपले समर्थन व्यक्त केले.
लोहगाव परिसरातून पठारे यांना पाठिंबा वाढत आहे. प्रीतम खांदवे यांचा पाठिंबा मिळाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पाठिंब्यामुळे लोहगाव परिसर व वडगावशेरी मतदारसंघात आघाडीला अधिक बळकटी मिळाली असल्याचे मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीत जनतेच्या व्यापक समर्थनाने विजय संपादन करण्याचा आत्मविश्वास महाविकास आघाडीने व्यक्त केला आहे.
बापूसाहेब पठारे हे एक अनुभवी, कर्तव्यनिष्ठ आणि समाजाच्या हितासाठी कार्य करणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली परिसरात अनेक विकास कामे झाली आहेत. त्यांच्या दूरदृष्टीने आगामी काळातही विकास कामे सुरूच राहतील, अशी खात्री असल्याचे माजी उपसरपंच प्रीतम खांदवे-पाटील यांनी सांगितले.
तर लोहगावसाठी नेहमीच कार्यरत होतो. या पुढील काळातही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना बापूसाहेब पठारे यांनी सांगितले.