पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. त्यामुळे आता प्रचारासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. शहरातील चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे वडगाव शेरी. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) उमेदवार सुनील टिंगरे (Sunil Tingre) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) उमेदवार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांच्यात सामना रंगणार आहे.
बापूसाहेब पठारे यांनी नवी खडकी तसेच वडगाव शेरी येथील भैरवनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. तसेच, भैरवनाथ चरणी विजयाचे साकडे घातले. शुभारंभ प्रसंगी काढण्यात आलेल्या पदयात्रेत मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
सार्वत्रिक निवडणुकीच्या विधानसभा पार्श्वभूमीवर बलिप्रतिपदा व भाऊबीज सणाचा मुहूर्त साधून शुभारंभ करण्यात आला. मागील दोन दिवसांपासून पुणे शहरातील सर्वच उमेदवारांच्या प्रचाराची धामधूम दिसून आली.
यावेळी बापूसाहेब पठारे म्हणाले, ” हा केवळ प्रचाराचा शुभारंभ नाही, तर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा आणि माझ्या नागरिक बांधवांच्या उन्नतीचा शुभारंभ आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीशी असलेल्या नागरिकांच्या दिसणाऱ्या प्रतिसादाने विजयाची समीकरणे सोपी केली आहेत. नागरिकांचा माझ्या कार्यपद्धतीवर व दूरदृष्टीवर विश्वास आहे आणि येणाऱ्या काळात या विकासाच्या रूपात हा विश्वास मी सार्थ करणार आहे.”
दोन्ही ठिकाणी पार पडलेल्या शुभारंभ प्रसंगी तरुण तसेच महिलावर्गापासून आबालवृद्धांपर्यंत गर्दी दिसून आली. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.