पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नौदल अधिकाऱ्यानं बेडरूममध्ये लावले CCTV ! पुढं झालं ‘असं’

वडोदार : वृत्तसंस्था – निवृत्त नौदल अधिकारी असलेल्या पतीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यानं पत्नीच्या बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. हे प्रकरण सध्या कोर्टात असून कोर्टनं त्याला चांगलाच दणका दिला आहे. कॅमेरे हटवण्याचेच नाही तर प्रत्येक महिन्याला भरपाई म्हणून 40 हजार रुपये देण्याचे आदेश त्याला कोर्टानं दिले आहेत.

पती दारू पिऊन आल्यानंतर नेहमीच तिला मारहाण करत असे. या मारहाणीचा कोणताही पुरावा नको म्हणून तो घरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद करत असे. हे सीसीटीव्ही कॅमेरे काढण्याचे अंतरिम आदेश कोर्टानं दिले आहेत.

नेमकं काय घडलं ?

कोविडच्या काळात मार्च अखेरीस महिला वडोदरा येथून मुंबईला राहायला आली होती. ती आपल्या दोन मुलांसह रहात होती. 20 मे रोजी निवृत्त नौदल अधिकारी असलेल्या तिच्या पतीनं वडोदरातील घरातील बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले. यामुळं तिला आणि मुलीला घरात वावरणं कठिण झालं होतं. त्यांनी त्याला सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यासाठी विनंतीही केली. काही दिवसांनी महिला वडोदराला त्याच्याकडे गेली असता त्यानं शिवीगाळ केली आणि तिचा मोबाईलही फोडला. यानंतर तिनं पोलीस ठाणे गाठले. यानंतर त्यानं तिचे आधारकार्ड, पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे ताब्यात घेतली. ती पुन्हा पोलीस ठाण्यात गेली. मात्र पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला नाही. एप्रिल ते जून अशा 3 महिन्यांच्या काळात त्यानं छळ केल्याची तक्रार तिनं केली आहे.

पती सीसीटीव्ही बंद करून तिला मारहाण करत असे असं तिनं तक्रारीत म्हटलं आहे. अखेर तिनं कोर्टात धाव घेतली. पतीपासून संरक्षण मिळावं अशी मागणीही तिनं वकिलामार्फत केली. इतकंच नाही तर मुलांना आणि तिला खर्चासाठी पैसे देण्यात यावेत अशी मागणीही तिनं केली. कोर्टानं घरातील सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यासह दर महिन्याला तिला 40 हजार रुपये देण्याचे आदेश दिले.