अकोलेत पिचड विरोधी लाट, माकपच्या बैठकीत सर्वजण आक्रमक

अहमदनगर (अकोले) : पोलीसनामा ऑनलाइन – अकोले तालुक्यात सध्या पिचडविरोधी लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे पिचडांचा प्रचार करणारा माणूस हा गुन्हेगार असणार आहे, अशी भावना सर्वसामान्य जनतेची निर्माण झाली असल्याची टीका जेष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी केली.

अकोलेतील माकप पक्ष कार्यालयात पिचड विरोधकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानाहून दशरथ सावंत बोलत होते. दशरथ सावंत पुढे म्हणाले की, अकोले तालुका हा पिचडांनी गेली 40 वर्षे विकासापासून वंचित ठेवला आहे. त्यातच पिचडांना सत्तेची फळे चाखायची सवय लागल्यामुळे ते भाजप सारख्या जातीयवादी पक्षात दाखल झाले असल्याची घणाघाती टीका ही त्यांनी केली.

भाजप सरकार हे शेतकऱ्याच्या विरोधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या सरकार विषयी मोठी चीड निर्माण झाली आहे, असे ही सावंत म्हणाले. पाच वर्षात विकास झाला नाही, म्हणून पक्षांतर करणे हे पिचडांचे कारण चुकीचे आहे. सांगोला मतदार संघातील शेकापचे आमदार गणपतराव देशमुख सलग 11 वेळा निवडून आले आहेत. त्यांच्या मतदारसंघात मोठी कामे झाली असून नागरिक त्यांनीच विधानसभेत उमेदवारी करावी, अशी अपेक्षा धरून आहेत. त्यामुळे आपलंच नाणं खोटं असल्याची टीका ही दशरथ सावंत यांनी केली.

कॉ. डॉ. अजित नवले म्हणाले की, यंदाची निवडणूक निर्णायक वळणार आली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत विजय आपलाच असल्याचा विश्वास डॉ. नवले यांनी व्यक्त केला. निवडणुकीत मतदान घडवून आणणे हे जोखमीचे काम असून सत्ताधारी प्रलोभने दाखवून मत फोडतात. ही मत फोडाफोडी बंद झाली तर यंदा विजयाचा गुलाल आपलाच असेल अशी आशा ही अजित नवले यांनी व्यक्त केली.

या बैठकीस जेष्ठ नेते अशोकराव भांगरे, राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार डॉ. किरण लहामटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, युवानेते अमित भांगरे, सोन्याबापू वाकचौरे, विनय सावंत, विलास नवले, कॉ.तुळशीराम कातोरे, संभाजी वाकचौरे, यमाजी लहामटे, भानुदास तिकांडे, विनोद हांडे, आर.के.उगले, सीताबाई पथवे, सुरेश खांडगे, राजेंद्र कुमकर, राजेंद्र घायवट, नामदेव भांगरे, विलास आरोटे आदी उपस्थित होते.

visit : Policenama.com