पंढरपुरात वंचित आणि वारकर्‍यांचे आंदोलन

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनानंतर मंदिरे खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पंढरपुरात आंदोलन करणार आहेत. आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर सोलापूरहून पंढरपूरला रवाना झाले आहेत. आंदोलनाच्या सुरुवातीला चंद्रभागा स्नान होईल, त्यांनंतर पुंडलिक दर्शन करुन प्रकाश आंबेडकर हे विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील. या आंदोलनला 200 पेक्षा जास्त संघटनाचा पाठिंबा असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिली.

नाकाबंदीमुळे वारकरी आणि वंचित बहुजन आघाडीचे मोजकेच कार्यकर्ते पंढरपूरमध्ये दाखल झाल्याने एक लाख वारकर्‍यांची घोषणा हवेतच विरणार आहे. प्रकाश आंबेडकर काल काहीवेळ माळीनगर इथे थांबून सोलापूरला मुक्कामाला गेले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी काल त्यांच्यासोबत चर्चा केली होती. मोजक्या कार्यकर्त्यांसह नामदेव पायरीजवळ भजन करण्याची परवानगी द्यावी किंवा मोजक्या वारकर्‍यांसह मंदिरात सोडण्याची मागणी केली होती. आता यावर मुख्यमंत्री पातळीवर विचार सुरु आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांना मोजक्या वारकर्‍यांसह विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र भजन-कीर्तनासाठी मंदिर सुरु करण्यात यावे अशी मागणी वारकरी संघटनांमार्फत करण्यात आली होती.