वंचित बहुजन आघाडीची ‘ही’ नवी अट, काँग्रेस पेचात

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता विविध राजकीय पक्षांच्या वाटाघाटींना वेग आला आहे. अनेक पक्षांकडून दवे प्रतिदावे केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी पराभवास सामोरे जावे लागले होते. त्यामुळे विधानसभेसाठी वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामगिरीच्या आधारावर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसशी विधानसभा निवडणुकीसाठी जागांची बोलणी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेली या दोन पक्षातील बोलणी यशस्वी झालेली नाहीयेत. अशातच वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसपुढे नवी अट ठेवली आहे.

काय आहे अट :
प्रकाश आंबेडकर यांनी घातलेल्या अटीने काँग्रेससमोर चांगलाच पेच उभा राहीला आहे. आमच्यासोबत आघाडी करायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायचे नाही अशी अट वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला घातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची बरीच मते शिवसेना आणि भाजपकडे वळत असल्याचा दावा त्यानी यावेळी केला. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला निम्म्या जागा मागत ५०-५० असा जागा वाटपाचा फॉर्म्युला दिला आहे. याआधी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला न मागता पाठिंबा दिला होता याची आठवण करून देत राष्ट्रवादीवर अविश्वास दाखवला आहे.

सगळ्या विरोधकांनी एकत्र यावे ही इच्छा – राष्ट्रवादी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना या नव्या अटीबाबत विचारलं असता ते म्हणाले की, “आमची इच्छा सगळ्या विरोधकांनी एकत्र यावे ही आहे. प्रकाश आंबेडकरांनी सांगावे की त्यांना लोकांना जोडायचे आहे की त्यांच्यात फूट पाडायची आहे.” काँग्रेसने वंचितसोबत आघाडी करण्यासाठी ४ वेळा पुढाकार घेऊनही वंचित आडमुठेपणा करत असून त्यांना आघाडी करायचीच नसल्याचे काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.