वंचित बहुजन आघाडीकडून आज ‘राज्यव्यापी बंद’ची हाक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. सीएए आणि एनआरसी विरोधात तसेच देशातील ढासळत्या अर्थव्यवस्थेविरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आल्याचे आवाहन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. या बंदमध्ये राज्यातील छोट्या मोठ्या अशा ५० हून अधिक संघटना सहभागी होणार आहे. वंचित आघाडीने पुकारलेल्या बंदमध्ये शिक्षण विभागाकडून सहकार्य मिळावे यासाठी वंचित आघाडीचे उपाध्यक्ष डॉ. अरुण सावंत यांनी निवेदन दिले आहे. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राज्यभरातील पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

वंचित आघाडीने बंद पुकारला असला तरी सकाळपासून राज्यातील बहुतांश शहरात जनजीवन सुरळीत सुरु आहे. मुंबईत दोन ठिकाणी बेस्ट बसेस अडविण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्या असल्या तरी अन्यत्र कोठेही काही अनुचित प्रकार आतापर्यंत तरी समोर आलेला नाही. दोन वर्षांपूर्वी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या विरोधात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वप्रथम आंदोलनास सुरुवात करु बंदची हाक दिली होती.

त्याला सर्वच डाव्या पक्षांनी पाठिंबा दिल्याने संपूर्ण राज्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. पण, आता महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले आहे. ज्या कारणासाठी आंबेडकर यांनी बंद पुकारला आहे. त्याला पाठिंबा असला तरी ते या बंदमध्ये सहभागी होत नाही. त्यामुळे या बंदला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –