‘वंचित’ आघाडीचा कॉंग्रेसच्या ‘या’ उमेदवारास पाठिंबा

बावडा : पोलिसनामा ऑनलाईन – नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे आणि यामध्ये वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसच्या उमेदवारांना विजयापासून वंचित ठेवले होते. तसेच लोकसभेत काँग्रेस आघाडीबरोबर जागेवरून बिघाडीही झाली होती. पण पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद बावडा-लाखेवाडी गट पोटनिवडणुकीत चक्क वंचित आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार अंकिता हर्षवर्धन पाटील यांना यापूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही पाठिंबा जाहीर करण्यात आला. बावडा (ता.इंदापूर) येथे आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वानुमते कॉंग्रेसच्या उमेदवार अंकिता हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा देण्यावर एकमत आले असून पाठिंबा जाहीर करण्यात आला.

वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मते सदर निवडणूक ही उत्साहाची नसून रत्नप्रभा देवी पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेची होत आहे. त्यामुळे भावनिक असलेल्या निवडणुकीत आम्ही आमचा उमेदवार देणार नाही, असे जाहीर करण्यात आले. सदर बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर तालुका अध्यक्ष शरद चीतारे, जिल्हा सचिव विकास कांबळे, तालुका उपाध्यक्ष प्रा. सतीश जगताप, सचिव अमोल भोसले, सह सचिव लखन भोसले, बावडा शहर अध्यक्ष अण्णा कांबळे, राष्ट्रवादीचे अशोक घोगरे, उदयसिंह पाटील, मयुर सिंह पाटील, मनोज पाटील, सरपंच किरण पाटील आदी उपस्थित होते.

You might also like