प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का : निकालाआधीच वंचित बहुजन आघाडीत फूट ; मिलिंद पखाले यांनी ‘या’ कारणासाठी दिला राजीनामा

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकांच्या आधीच जोरदार झटका बसला आहे. भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व म्हणजे ४८ जागांवर आपले उमेदवार दिले होते. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी काम केल्याचा आरोप करत भारिपचे माजी सरचिटणीस मिलिंद पखाले यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, कि आंबेडकरी चळवळीला मदत होईल म्हणून १२ वर्षांपूर्वी भारीपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता पक्ष फक्त सत्ता मिळवण्याचे खोटे स्वप्न दाखवत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत राज्यात एकही जागा मिळणार नाही. ९० टक्के जागी त्यांच्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त होईल, असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले. मिलिंद पखाले यांच्यासह पक्षाच्या आणखी २० जुन्या कार्यकर्त्यांनी देखील राजीनामा दिला आहे. सर्व जागा लढविण्याच्या आघाडीच्या निर्णयावर देखील त्यांनी यावेळी टीका केली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत या आघाडीचा फायदा हा सर्वात जास्त भाजपाला होणार असल्याचा दावा अनेक राजकीय विश्लेषक करत आहेत. त्यामुळे मिलिंद पखाले यांच्या राजीनाम्यानंतर या दाव्याला हवा मिळाल्याची चर्चा आता रंगते आहे.