Exit Poll 2019 : हिंगोलीत काॅंग्रेस ‘भुईसपाट’ ; शिवसेनेचा भगवा ‘फडकणार’ की वंचित ‘टक्कर’ देणार ?

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मोदी लाटेत कॉंग्रेसची लाज राखणारा निकाल हिंगोलीत लागला होता. राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांना हरवून काही हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. परंतु २०१९ च्या लोकसभा निव़डणूकीत कॉंग्रेसचे सुभाष वानखेडे आणि शिवसेनेचे हेमंत पाटील यांच्यात चुरस होईल असे वाटले होते. परंतु वंचित बहुजन आघाडीने हिंगोलीत कॉंग्रेसला चांगलाच झटका दिला आहे. वंचित बहुजन आघाडीने तेथे मोहन राठोड यांना उमेदवारी देऊन येथील निकालाची गणितंच बददली आहेत. त्यामुळे येथील निवडणूक कॉंग्रेसऐवजी वंचित विरुध्द शिवसेना अशी लढत रंगलेली दिसली.

सुभाष वानखेडे शिवसेना व्हाया भाजप टू कॉंग्रेसचा फटका

हिंगोली लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांनी मोदी लाटेतही २०१४ मध्ये कॉंग्रेसची अब्रु राखली होती. त्यावेळी शिवसेनेकडून त्यांचे प्रतिस्पर्धी होते सुभाष वानखेडे. परंतु २०१९ मध्ये कॉंग्रेसकडून राजीव सातव यांच्यावर गुजरातची जबाबदारी दिल्याने त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर कॉंग्रेसकडून ऐनवेळी तगडा उमेदवार देण्याची चाचपणी सुरु केली. एकीककडे आधीपासूनच लोकसभेची तयारी करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमधील राजीव सातव यांच्यावर नाराज असेलेल्या उमेदवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता फार कमी होती. त्या तोडीचा नेता मिळण्याची शक्यता असतानाही कॉंग्रेसने शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या सुभाष वानखेडे यांना गळ घातली.

ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी सुभाष वानखेडे यांचे नाव जाहिर करण्यात आले. त्यामुळे कॉंग्रेसच्य़ा गोटात प्रचंड खळबळ उडाली. कळमनुरी, हदगाव, आणि हिंगोलीच्या काही भागात आपले वर्चस्व असलेल्या राजीव सातव यांच्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आता राजीव सातव यांच्याविरोधात पडलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्याची नामुष्की सहन करावी लागली. त्यामुळे कॉंग्रेसचा प्रचार हिंगोलीत काहीसा कमी पडला. त्यामुळे नाराज असलेला कार्यकर्ता आणि मतदार यांनी कॉंग्रेसला सपशेल नाकारले.

वंचितची खेळी यशस्वी
हिंगोली मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने जातीय समीकरणांचा सकारात्मक वापर करण्याच्या हेतूने आपला उमेदवार दिला आहे. या मतदारसंघात अनुसुचित जाती ११.११ टक्के, अनुसुचीत जमाती – १२.५७ टक्के, इतर मागास प्रवर्ग ३५. १९ टक्के मतदार आहे.

त्यात बंजारा, हटकर, बौध्द वंजारी, माळी, गहोंड, भिल्ल, या आदीवासी जमाती यांचं मतदान मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात बंजारा समाजाचं मतदान सुमारे ३ लाख आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने हिंगोली मतदारसंघात बंजारा उमेदवार दिला. मोहन राठोड यांना उमेदवारी दिल्याने हिंगोली मतदार संघातील गणितं बदलली. तर प्रकाश आंबेडकर यांनी प्रचारादरम्यान ३ जंगी सभा घेतल्या. या सभांना मतदारांनीही मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर गाव पातळीवरील नियोजन, जातीय नेत्यांच्या भेटी यामुळे वंचित बहुजन आघाडीला मतदारांनी वंचितला कौल दिल्याचे दिसते.

शिवसेनेचा पारंपारिक मतदार पाठीशी
हिंगोली मतदारसंघात मतदारांनी नेहमी सत्तांतर घडवून आणले आहे. सध्या शिवसेनेकडे २, भाजपकडे २, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसकडे प्रत्येकी १ विधानसभा मतदारसंघ आहे. उमरखेड किनवट, हदगाव,हिंगोली विधानसभा मतदारसंघांत शिवसेना, भाजपचे प्राबल्य आहे. त्यात शिवसेनेने नांदेडचा उमेदवार दिला.

त्यामुळे याचा फटका बसू शकत होता. पारंपारिक मतदाराने शिवसेनेला पसंती दर्शवली. परंतु कॉंग्रेसने प्रबळ उमेदवार न दिल्याने आणि वंचित बहुजन आघाडीशी थेट लढाई असल्याने कॉंग्रेसचा मतदारही काही प्रमाणात शिवसेनेकडे वळला आहे. मागील निवडणूकीत मोदी लाटेत राजीव सातव केवळ १६३२ मतांनी निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या पारंपारिक मतदारांनी तर साथ दिलीच. परंतु खुल्या प्रवर्गातील कॉंग्रेसच्या मतदारानेही शिवसेनेला पाठबळ दिल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे येथील निवडणूकीत शिवसेनेला अधिक फायदा झाला.

हिंगोली मतदारसंघात कॉंग्रेसची चुकलेली रणनीती, वंचित फॅक्टर शिवसेनेच्या पथ्यावर पडणार की काय असंही आहे. परंतु येथील अटीतटीच्या लढतीत नेमकं काय होईल हे आताच सांगता येणार आहे.