कौतुकास्पद ! पोलिसांच्या दिमतीला आता कलाकारांच्या व्हॅनिटी वॅन, कर्मचार्‍यांना मिळाला मौठा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सिनेमा आणि मालिकांचे चित्रीकरण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चित्रीकरण बंद असल्याने कलाकारांच्या दिमतीला असलेल्या व्हॅनिटी वॅनलाही बुकींग नाही. त्यामुळे मुंबईतील व्हॅनिटी वॅनचे मालक केतन रावल यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रावल यांनी त्यांच्या मालकीच्या काही व्हॅनिटी वॅन बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी दिल्या आहेत.

यासंदर्भात केतन रावल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, रोहित शेट्टीचा सर्कस सिनेमा, संजय लीला भन्सालीचा गंगूबाई काठियावाडी आणि आनंद एल. राय यांचा रक्षाबंधन या सिनेमांसाठी माझ्या व्हॅनिटी वॅन दिल्या होत्या. परंतु या सिनेमांचे चित्रीकरण सध्या कोरोनामुळे बंद आहे. त्या व्हॅनिटी मी आता मुंबई पोलिसांच्या सेवेसाठी दिल्या आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलिसांसाठी व्हॅनिटी दिल्या होत्या. त्यामुळे त्यांचा वॉशरूमला जाण्याचा, कपडे बदलण्याचा मोठा प्रश्न सुटला होता. आताही अशाच प्रकारची सेवा मी दिली आहे. जेव्हा परिस्थिती सुधारून सर्व काही सुरळीत होईल, तेंव्हा या व्हॅनिटी व्यवस्थित सॅनिटाईज करून पुन्हा चित्रीकरणस्थळी दिल्या जातील, असे रावल म्हणाले.