५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी त्या वनपाल व वनरक्षकाला शिक्षा

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – फर्निचरच्या दुकानात व्यवसायासाठी खरेदी केलेल्या सागवान लाकडाची तपासणी करून व पावती करून ५ हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी जुवार्डी बीटच्या वनपाल व वनरक्षकाला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ कलमानुसार ३ वर्षे शिक्षा व २ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास २ महिने साधी कैद तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १३ (१) (ड) नुसार ४ वर्ष सक्त मजूरी व ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास शिक्षा सुनावली आहे.

वनपाल रघुनाथ रामदास देवरे व वनरक्षक विठ्ठल भास्कर पाटील अशी दोघांची नावे आहेत.

तक्रारदार यांचे फर्निचरचे दुकान आहे. त्या दुकानात व्यवसायासाठी खऱेदी केलेल्या सागवानी लाकडाची तपासणी करून त्याच्या पावत्या पाहून लाकूड जास्त आहे. असे म्हणत त्यांच्याकडून ५ हजार रुपयांची लाच मागितली. तसेच ही रक्कम न दिल्यास केस करण्याची धमकी देत वनरक्षक पाटील याने ५ हजार रुपयांची लाच २७ जूलै २०१५ रोजी स्विकारली. त्यांना लाच स्विकारताना तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.बी. भाबड यांच्या पथकाने रंगेहात पकडले होते. त्यानंतर याप्रकरणी तपास करून त्यांनी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

याप्रकऱणी सरकारी वकील सुनील कुराडे यांनी काम पाहिले. पोलीस उपअधिक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, पोलीस नाईक प्रकाश सोनार यांनी याबाबतच्या कामाकाजात मदत केली. तर गुन्ह्याच्या तपासात पोलीस कर्मचारी प्रवीण अमृतकर व देवेंद्र वेंदे यांनी मत केली.