पोलिसांचा सेक्स रॅकेटच्या अड्डयावर छापा, भितीनं 3 युवतीनी टाकली छतावरून उडी, एकीचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील वाराणसी परिसरातून पोलिसांनी सेक्स रॅकेटच्या पर्दाफाश केला आहे. संजयनगर कॉलनीमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याआधारे रविवारी रात्री उशिरा पोलिसांच्या पथकानं सापळा रचून ही कारवाई केली. यावेळी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून पकडले जाण्याच्या भीतीनं यातील तीन तरुणींनी छतावरून उडी मारली, ज्यात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. इतर दोन तरुणी जखमी झाल्यानं त्यांच्यावर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे. यासोबतच तीन बाईक, कार, टेम्पो पकडण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पप्पू सिंह यांच्या घरात हे सेक्स रॅकेट सुरु होत. जे काही दिवसांपूर्वी तीन मुलं आणि दोन मुलींनी भाड्याने घेतलं होतं. तपासणीदरम्यान तरुणींचे पासपोर्ट मिळाले असून त्या विदेशी असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, दोन दिवसांआधी घराखाली उभ्या असलेल्या गाडीवरून स्थानिकांचा या तरुणांशी वाद झाला. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावलं आणि याची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, कारवाईच्या वेळी पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी तरुणींची धावपळ सुरू झाली. पकडलं जाण्याच्या भीतीनं तिघींनी चक्क छतावरून उडी टाकली. यामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणी जखमी आहेत. तर इतर तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.