मल्ल्या आणि नीरव मोदीच्या एक पाऊल पुढे टाकत उघडली बँकेची बनावट शाखा!

वाराणसी: वृत्तसेवा
देशामध्ये मागील काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या बँकेच्या घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस येत आहे. परंतु आत्तापर्यंत कधीही विचारही करु न शकणारा बँक घोटाळा उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने कर्नाटक बँकेची बनावट शाखा सुरु करुन अनेक ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आफक अहमद याला अटक केली असून त्याच्याकडून एक लाख ३७ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
अहमद याने बलिया जिल्ह्यामध्ये कर्नाटक बँकेची बनावट शाखा उघडली. या बँकेच्या शाखेत नागरिकांची १५ बचत खाती आणि काही ठेवी ठेवल्याचे तपासात आढळून आले.

हुबेहुब बँकच
अहमदने सुरु केलेली बनावट शाखा अगदी हुबेहुब बँकेसारखीच होती. ज्या प्रमाणे बँकेच्या शाखेत कामकाज चालते तसेच कामकाज या शाखेत चालत होते. विशेष म्हणजे अहमद स्वत: या शाखेचा मॅनेजर होता. त्याने आपले खरे नाव लपवून क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्या नावावरुन विनोद कुमार कांबळी असे नाव ठेवले होते. तसेच त्याने या नावाची काही कागदपत्रे तयार करुन त्यावर पश्चिम मुंबईचा पत्ता दिला होता.
पोलिसांनी अहमदच्या या बँकेची तपासणी केले असता मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सापडली. त्यामध्ये बँकेचे पासबुक, खाते उघडण्यासाठी अर्ज, तीन संगणक, एक लॅपटॉप, टेबल खुर्चीसह अन्य गोष्टी पोलिसांना मिळून आल्या.