‘हॅलो पोलिस, मी आता मुलांना आणि पत्नीला जीवे ठार मारलं, आता आत्महत्या करण्यासाठी जातोय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाराणसीच्या मुकीमकंज क्षेत्राच्या नचनी कुआ परिसरात शुक्रवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. पंखा व्यापारी चेतन तुलस्यान (45) यांनी मुलगा हर्ष (19), मुलगी हिमांशी (17) आणि पत्नी ऋतु (42) यांना झोपेच्या गोळ्या खायला घालून गळा दाबून हत्या केली. यानंतर स्वत: देखील फाशी घेऊन आत्महत्या केली. पत्नी आणि मुलांच्या हत्येनंतर चेतन यांनी सकाळी 4.35 मिनिटांनी 112 वर संपर्क साधून सांगितले की मी सर्वांची हत्या केली आहे आणि आता मी देखील आत्महत्या करत आहेत.

ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत उशीर झालेला होता. पोलिसांनी चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. घटनास्थळी 8 पानांची सुसाइड नोट मिळाली आणि प्रतिज्ञापत्र जप्त करण्यात आले. सुसाइड नोटनुसार डोळ्यांची कमी होत असलेले दृष्टी, आर्थिक तंगी आणि इतर कारणाने कुटूंबाने स्वत:ला संपवले. चेतनने आपले घर आणि दुकान गोरखपूरमधील आपल्या पत्नीच्या भावाला देण्याचे या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.

एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार कुटूंबाने पूर्ण तयारीने आणि सहमतीने हा प्रकार केला आहे. आदमपूर पोलीस स्टेशन हद्दीत मुकीमगंज परिसरात पहिल्या मजल्यावर चेतन यांच घर आहे. त्या घराच्या तळ मजल्यावर त्यांचे वडील तुलस्यान आणि आई विमला देवा राहतात.

त्यांचा एक भाऊ महमूरगंज परिसरात आणि दुसरा भाऊ सूरतमध्ये राहतो. चेतन आणि त्यांच्या आई वडीलांमध्ये फारसे पटत नव्हते. चेतन यांना पंख्याचे असेंबलिग करुन 5 हजार प्रति महिना आणि दुकानाच्या भाड्यातून 13 हजार प्रति महिना मिळत होते.

चेतन यांच्या संपर्कानंतर जेव्हा पोलीस त्यांचे घर शोधत घटनास्थळी आले तेव्हा त्यांच्या घराखालून त्यांचे वडील बाहेर आले. पोलिसांनी त्यांना चेतन यांना बोलवण्यास सांगितले. ते वर गेले परंतु दरवाजा कोणीही उघडला नाही. पोलिसांनी दरवाजा उघडल्यावर समोर दिसले की एका खोलीत चेतन यांची मुलं मृतावस्थेत पडली आहेत.

तर दुसरीकडे एका खोलीत ऋतू (पत्नी) जमिनीवर पडल्या होत्या आणि चेतन फासावर लटकत होते. चौघांजवळ झोपेच्या होमियोपॅथिक गोळ्या पडल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.