‘या’ कारणामुळं PM मोदींनी पाठवलं रिक्षा चालकाला पत्र, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाराणसीतील एका रिक्षा चालकाच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र त्यांच्या आनंदात अजून जास्त भर पडली असून त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. यामागचं कारण म्हणजे रिक्षा चालकाने आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका पंतप्रधान मोदींना पाठवली होती. त्या पत्राचे उत्तर मिळाले असून नरेंद्र मोदींनी मुलीला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देणारं एक पत्र पाठवलं आहे. त्यामुळे रिक्षाचालकाच्या घरात आनंदाचे वातावरण आहे.

या रिक्षाचालकाने नाव मंगल केवट असे असून ते वाराणसीतील दोमरी या गावात वास्तव्य करतात. विशेष म्हणजे हे गाव पंतप्रधान मोदींनी दत्तक घेतले आहे. आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका मंगल यांनी मोदींना पाठविली होती, दिल्लीतील पीएमओच्या कार्यालयात जाऊन ही पत्रिका देण्यात आली होती. या पत्राचे उत्तर देण्यात आले असून मोदींनी मुलीला आणि त्यांच्या जावयाला लग्नाच्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा पत्राद्वारे दिल्या.

मंगल यांनी सांगितले की, ‘आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लग्नाचं निमंत्रण पाठवलं होतं. या पत्राची दखल घेतली जाईल अशी आशा नव्हती परंतु ८ फेब्रुवारी रोजी आम्हाला पंतप्रधानांकडून शुभेच्छांचं एक पत्र आलं. ते पाहून आम्हाला प्रचंड आनंद झाला. नरेंद्र मोदी हे देशातील सर्व सामान्य लोकांची काळजी घेणारे पंतप्रधान आहेत आणि याचा पुरावा हे पत्र आहे’ असे मंगल यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १६ फेब्रुवारी रोजी वाराणसी दौऱ्यावर आहेत. या दरम्यान मंगल यांनी मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की पंतप्रधानांना भेटून त्यांना आमच्या समस्या सांगायच्या आहेत असे त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी इच्छा व्यक्त केली आहे.

You might also like