पोलिसांनी नाकाबंदीत मागितले ओळखपत्र, त्याने फोनवर वीजपुरवठाच खंडित केला

पोलिसनामा ऑनलाईन – नाकाबंदीदरम्यान उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील एक विचित्र घटना घडली आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधीक्षकांबरोबरच पोलीस कर्मचारीही गोंधळून गेले होते. सध्या हे प्रकरण शहरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. लंका पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी वाराणसीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अमित पाठकही वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी वीज विभागामध्ये काम करणारा कर्मचारी संजय सिंह याला अडविण्यात आले होते. त्याला ओळखपत्र मागितले असता, संजयने फोनवर संपूर्ण परिसराची वीजच खंडित केली.

संजयने करौंदी वीज उपकेंद्रामध्ये रात्री 2 वाजून 13 मिनिटांनी फोन करुन नाकाबंदी करण्यात आलेल्या परिसरातील वीजपुरवठा खंडीत केला. हा प्रकार पाहून पोलीस कर्मचार्‍यांबरोबर एसएसपीही गोंधळून गेले. चार मिनिटांपर्यंत हा पूर्ण परिसर अंधारात होता. त्यानंतर 2 वाजून 17 मिनिटांनी संजयने परत फोन करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यास सांगितल्यानंतरच वीज आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत एसएसपींनी संजयची तक्रार पूर्वांचल विद्युत वितरण निगमच्या व्यवस्थापकीय अध्यक्षांकडे केली आहे. या प्रकरणामध्ये चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर संजय यांच्या सांगण्यावरुनच करौंदी उपकेंद्रातील रामलखन या कर्मचार्‍याने वीजपुरवठा खंडित केल्याचे उघड झाले. लॉगबूकमध्ये वीजपुरवठा खंडित केल्याचा आणि पुन्हा सुरु केल्याचा वेळ नमूद करण्यात आला असला तरी कारण देण्यात आलेले नाही. हा वीजपुरवठा खंडित करताना योग्य काळजी घेण्यात आली नाही. या दोघांनाही नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे.