माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या सोन्याबद्दलच्या ‘त्या ‘विधानानंतर काशी विश्वनाथ मंदिरानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारनं जाहीर केलेल्या पॅकेजवरती समाधान व्यक्त केलं होत. त्यानंतर त्यांनी निधी उभार करण्यासाठी केंद्र सरकारला एक पर्याय सुचवला होता. सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थानातील ट्रस्टमध्ये पडून असलेलं सोनं कर्जाच्या स्वरूपात ताब्यात घेण्याची सूचना त्यांच्याकडून करण्यात आली होती.

कोरोना संसर्गामुळे ठप्प झालेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा देत २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. मोदींनी घोषित केलेल्या या पॅकेजवरती देशातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या घोषणेचं स्वागत केलं होत. त्यानंतर चव्हाण यांनी मोदी सरकारला आणखी एक सल्ला दिला होता. ‘केंद्र सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेलं सोनं कर्जानं ताब्यात घ्यावं. जागतिक सोनं परिषदेच्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (७६ लाख कोटी रुपये) इतकं सोनं आहे. सरकारनं हे सोनं १ किंवा २ टक्के व्याजानं परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावं, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला दिला होता.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या देवस्थान ट्रस्ट मधील सोनं ताब्यात घेण्याच्या सूचनेनंतर काशी विश्वनाथ मंदिराच्या महंतांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना काशी विश्वनाथ मंदिरात बंदी घालण्यात आली आहे. त्याचसोबत देशभरातील इतर ज्योतिर्लिंगाच्या पुरोहितांनी चव्हाण यांच्या कुटुंबाला मंदिरात प्रवेश नाकारण्यात यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच महंतांनी पृथ्वीराज चव्हाण हे मानसिकदृष्टया विक्षिप्त असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

काशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत आणि डॉ. कुलपती तिवारी म्हणाले की, ‘काँग्रेस सरकारच्या कार्य काळामध्येच १९८३ साली काशी विश्वनाथ मंदिरात चोरी झाली. यात काँग्रेसची मुख्य भूमिका होती असं त्यांनी सांगितलं. तसंच पृथ्वीराज चव्हाण यांचं मानसिक संतुलन ढासळल आहे. ते पूर्वग्रहानं ग्रासलेले आहेत असंही तिवारी यांनी म्हटलं आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी बेवसाईटने दिलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावरती टीका करण्यात आली होती.

तर चव्हाण यांनी स्वतः ट्विटरवरून माहिती देत याबाबतचा खुलासा केला आहे. ‘देशातील सर्वच धर्मातील देवस्थानाच्या सोन्याबद्दल मी दिलेल्या सूचनेचं, काही भक्त मीडियाने विपर्यास पणे वृत्तांकन केल. १९९९ मधील अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळातच, देशाने सोने तारण योजना सुरु केली होती, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसंच मोदी सरकारने २०१५ साली या योजनेचं नामांतर केलं. अर्थमंत्र्यांनी लोकभेत एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरानुसार, देशातील अनेक देवस्थानांनी त्यांचे सोने तारण ठेवलं आहे. त्यामुळं, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्यांवरती मी कार्यवाही करणार, असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.