दिल्ली हिंसाचार : कोणाचं 11 दिवसांपुर्वी झालं होतं ‘लग्न’, कोणी ‘दुध’ आणण्यासाठी निघालं होतं, जाणून घ्या 4 भयानक ‘किस्से’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून दिल्लीत मागील तीन दिवसांपासून हिंसाचारात मरणार्‍या लोकांमध्ये काही वेगळे होते तर बरेच काही साम्यदेखील होते. वेगळा धर्म, उंची-प्रकृती, वयसुद्धा वेगवेगळे. वेगळ्या भागात राहणारे. एक सारखे होते ते त्यांचे स्वप्न, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आणि भविष्य घडवणे. आपल्या गावात रोजगार मिळाला नाही, म्हणून त्याच्या शोधात हे लोक दिल्लीत आले. दिल्लीच्या बाहेरील गजबजलेल्या परिसरातील नाल्यांजवळील अरूंद गल्ल्या आणि कोंदट घरांमध्ये राहू लागले. अचानक एक दिवस जमाव त्यांना घेरून मारतो, किंवा कुठून तरी आलेली गोळी त्यांचा वेध घेते. दिल्लीत मागील चार दिवसात मारल्या गेलेल्या लोकांच्या अशा प्रकारच्या कथा ऐकल्या तर काळीजाचा थरकाप उडतो, वेदना होतात.

गुरु तेग बहादुर हॉस्पिटलच्या शवागृहात बुधवारी कधी मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश ऐकू येत होता, तर कधी स्मशना शांतता पसरत होती. सर्वत्र दु:ख, संताप आणि गोंधळाचे वातावरण होते. मृतांच्या नातेवाईकांच्या डोळ्यांत अश्रूंऐवजी प्रश्न होते. कुणासाठी आणि का मारले? ऐकले होते की दिल्ली सर्वांची आहे. एवढ्यात एक वडील आक्रोश करताना म्हणतात, गावात मजूरी करायची होती, कशाला इथे आलास.

1. कुठून तरी गोळी आली आणि फुरकानला लागली
कर्दमपुरीमध्ये राहणारा मुळचा बिजनौरचा फुरकान हँडीक्राफ्टचे काम करत होता. त्याची चार वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांच्या मुलासाठी त्याने अनेक स्वप्न रंगवली होती. तो घराच्या बाहेर आला आणि अचानक एका गोळीने त्याचा वेध घेतला. फुरकानचा भाऊ इम्रानला भाऊ जखमी झाल्याचे फोन करून सांगण्यात आले. तो जीटीबी हॉस्पिटलमध्ये धावत आला तर भावाचा मृत्यू झाला होता. नातेवाईक पोस्टमार्टमनंतर अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत होते. फुरकान पोटभरण्यासाठी छोटा व्यवसाय करणारा गरीब माणूस होता, त्याच्यावर यापुर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही.

2. अशफाकचे 11 दिवसापूर्वी झाले होते लग्न
बुलंदशहरच्या सासनी गावातील अशफाक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीत आला होता. 11 दिवसापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. तो इलेक्ट्रिशियन होता. हिंसाचार सुरू असताना तो एका ठिकाणी वीज दुरूस्तीच्या कामासाठी बाहेर होता. दंगलखोरांनी अशफाकला पाच गोळ्या मारल्या, त्याचा जागीच मृत्यू झाला. अशफाक हुसैनला चार भाऊ आणि चार बहिणी आहेत. शवगृहात आलेल्या त्याच्या काकांनी सांगितले की, त्याला शिकायचे होते. आयुष्यातील अडचणी त्याला दिल्लीत घेऊन आल्या आणि येथे आयुष्यच संपले.

3. कपडे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या दीपकचा मृत्यू
बिहारच्या गया येथून कामाच्या शोधात दिल्लीत आलेल्या दीपकला याची किंमत जीव देऊन चुकवावी लागली. सुमारे आठ वर्षांपूर्वी दीपकचे लग्न झाले होते. तो कुटुंबासोबत दिल्लीच्या मंडोली परिसरात मजूरी करून राहतो. कुटुंबात पत्नीशिवाय एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्याला त्याच्या मुलांना खुप शिकवून मोठे बनवायचे होते. मंगळवारी तो जाफराबादमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी गेला होता. तेथे जमावाने त्याच्यावर हल्ला केला. कुणीतरी दीपकला गोळी मारली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबात तो एकटाच कमावणारा होता.

4. दूध आणण्यासाठी गेलेला राहुल परत आलाच नाही
शिव विहारच्या बाबू नगरमध्ये राहणारा 26 वर्षांचा राहुल सोलंकी सोमवारी रात्री दूध आणण्यासाठी घराच्या बाहेर पडला. रस्त्यात त्याला लोकांनी घेरले. त्याच्या कुटुंबियांनी सांगितले की, त्याचा मृत्यू गोळी लागल्याने झाला. राहुल कुटुंबात सर्वात मोठा होता आणि खासगी कंपनीत काम करत होता. त्याला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. राहुलचा मृत्यू सोमवारी सायंकाळी झाला. मृतदेह घेण्यासाठी त्याच्या बहिणी आणि कुटुंबिय गुरु तेग बहादुर हॉस्पिटलच्या शवागृहाबाहेर बसले होते. राहुलचे काका अरब सिंह यांनी सांगितले की, एका मुलाचा मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेहसुद्धा सापडला नाही.

अशाच पद्धतीने ब्रहमपुरीच्या विनोदची सुद्धा हत्या करण्यात आली आहे. यापैकी कुणावरही कसालाही गुन्हा यापूर्वी दाखल झालेला नाही. हिंसाचार पसरवणार्‍यांचा जमाव आला आणि निष्पाप लोकांचा जीव घेऊन गेला आणि मागे राहिले ते त्यांचे आक्रोश करणारे नातेवाईक.