वारकर्‍यांची गैरसोय होऊ देणार नाही : महापौर मुक्ता टिळक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालख्याचे ७ जुलै रोजी पुण्यात आगमन होणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी आज अधिकार्‍यांसोबत पालखी मार्गाची पाहाणी केली आणि विविध प्रकारची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पालख्याचे शहरात आगमन झाल्यानंतर वारकर्‍यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

नगरसेवक प्रकाश ढोरे, शीतल सावंत, सुनीता वाडेकर, आदित्य माळवे, अमोल बालवडकर, विशाल धनवडे, अजय खेडेकर, नाना सांगडे, लक्ष्मी आंदेकर, सुलोचना कोंढरे, मनिषा लडकत, अतिरिक्त मनपा आयुक्त शीतल उगले-तेली, राजेंद्र निंबाळकर, माधव देशपांडे, सहायक मनपा आयुक्त विजय लांडगे यावेळी उपस्थित होते.

कळस-धानोरी, औंध-बोपोडी, संगमवाडी, पाटील इस्टेट, निवडुंग्या विठोबा मंदिर व पालखी विठोबा या पालखीतळांची पाहणी करण्यात आली. रस्त्यावरील बेवारस गाड्या उचलाव्यात, कचरा, राडारोडा उचलावा, खड्‌ड्यांची डागडुजी करावी, पालखी कालावधीत २४ तास पाणीपुरवठा करावा, मनपाचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, आरोग्यविषयक सुविधा पुरवाव्यात, मोबाईल टॉयलेट व स्वच्छतागृहांची व्यवस्था पुरवावी, महापालिका शाळा उपलब्ध करून द्याव्यात, पालखी मार्गाची स्वच्छता करावी, ड्रेनेजलाईनची प्रलंबित कामे पूर्ण करावीत, पालखी तळावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, आवश्यकतेनुसार विद्युत व्यवस्था करावी अशा सूचना महापौरांनी प्रशासनाला केल्या.