Vasant More | ‘वसंत, मिसळ महोत्सवाचे आयोजन कर, मी येईन’ ! आक्रमक वसंत मोरेंना राज ठाकरेंनी ‘बांधावर’ उभे केल्याची चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vasant More | ‘मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजविणार’ या पक्षाध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या आदेशाची अंमलबजावणीस नकार दिल्याने वसंत मोरे हे ‘मनसे’ मध्ये बाजूला फेकले गेले. यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अगदी काल परवा राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर ठाकरे यांनी मोरे (Vasant More) यांना ‘मिसळ’ महोत्सव घेण्याचे सुचविल्याने ठाकरे यांनी देखिल मोरे यांना ‘मनसे’ च्या बांधावर उभे केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

 

मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे प्रभागातील विकासकामे आणि नागरी प्रश्‍नांवर ‘ठोक’ भुमिका घेणारे फायरब्रँड नेतृत्व. परंतू पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेमध्ये ‘हिंदुत्वाचा’ राग आवळताना मशिदीवरील भोंगे हटवा अन्यथा मनसैनिक मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवतील असा इशारा देत सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला. अगदी दुसर्‍याच दिवशी शहरअध्यक्ष असलेले वसंत मोरे यांनी लोक प्रतिनिधी म्हणून प्रभागामध्ये मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणार नाही, अशी भुमिका घेतली. ही भुमिका घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत त्यांच्या जागेवर साईनाथ बाबर यांची शहरअध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. येथून मोरे विरूद्ध पक्षाच्या शहरांतील नेत्यांमध्ये अगोदरपासून असलेल्या मतभेदांच्या विस्तवाने आगीचे रुप धारण केले.

नाराज मोरे पक्ष सोडणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली. मोरे यांनी नियुक्त केलेल्या मुस्लिम पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले. मात्र, मोरे यांनी आपण राज ठाकरे यांच्यासोबतच राहणार आहोत, अशी वेळोवेळी भुमिका स्पष्ट केली. मात्र, यानंतरही खालकर चौकामध्ये पक्षाचे पदाधिकारी अजय शिंदे यांनी घेतलेला हनुमान चालिसाचा कार्यक्रम, पक्षाने ४ मे रोजी शहरात विविध ठिकाणी महाआरतीचे केलेले आयोजनाला मोरे ‘नॉट रिचेबल’ होणे यामुळे दरी अधिकच रुंदावली. तर दोनच दिवसांपुर्वी राज ठाकरे पुणे दौर्‍यावर असताना मोरे यांनी त्यांच्या प्रभागामध्ये घेतलेल्या महाआरतीच्या कार्यक्रमाला मनसेच्या पदाधिकार्‍यांची अनुपस्थिती यामुळे मोरे बाजूला फेकले गेल्यावर शिक्का मोर्तब झाले. मात्र, मोरे यांनी यानंतरही राज ठाकरे यांची भेट घेउन २५ मिनिटे चर्चाही केली. ही चर्चा करून बाहेर आल्यावर त्यांनी ठाकरे यांनी आपली भुमिका ऐकून घेतली असून ‘मिसळ महोत्सवाचे आयोजन कर मी नक्की येईन’ असा शब्द दिल्याचे मोरे यांनी सांगितले. (Vasant More)

परंतू नागरी प्रश्‍नावर प्रसंगी सातत्याने हातात ‘दंडुका’ घेणार्‍या व नगरसेवक पदाच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत संगीत महोत्सव,
देवस्थान यात्रा, सांस्कृतिक महोत्सव यासारख्या ‘लोकानुनय’ करणार्‍या योजनांना फाटा देणार्‍या मोरे यांना थेट मिसळ महोत्सवाचे आयोजन करायला सांगून राज ठाकरे यांनी त्यांना ‘बांधावर’ उभे केल्याचे बोलले जात आहे.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मोरे यांचे मन राखून त्यांच्या विरोधातील पदाधिकार्‍यांना नाराज करणे हे देखिल ठाकरे यांना जड जाणारे आहे.
त्यामुळे ‘बांधावरून’ मोरे यांनीच पुढील निर्णय घ्यावा, अशी परिस्थिती या ‘मिसळ महोत्सवाने’ निर्माण केल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

 

 

Web Title :- Vasant More | Former Corporator Vasant More MNS Chief Raj Thackeray Pune News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा