वाशी : नवनिर्माण मित्रमंडळाच्या सहयोगानं राजकुमार कुंभारनं साकारली रोपांच्या माध्यमातून ‘शिवप्रतिमा’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390 व्या जयंतीचे औचित्य साधून रोपट्यांच्या माध्यातून शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. या माध्यमातून छत्रपतींच्या रयतेच्या स्वराज्यातील वैचारिक, सामाजिक, विश्ववंदनीय वृक्ष संवर्धनिय बांधिलकीच्या विचारांचा जागर करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 9000 रोपांच्या माध्यमातून विश्वविक्रमी प्रतिमा साकारण्यात आली आहे. शिवरायांच्या वृक्षसंवर्धन आणि जलसंधारणविषयी विश्ववंदनीय धोरणांचा दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.

या प्रतिमेसाठी लागणारी रोपे ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिवप्रेमींनी जमा केली आहेत. नवनिर्माण मित्रमंडळ, वाशी यांच्या सहयोगाने राजकुमार कुंभार या उस्मानाबाद जिल्ह्यातील कलाकाराने ही प्रतिकृती तयार केली आहे. यामध्ये संपुर्ण 18 प्रकारच्या देशी वनस्पतींची रोपे वापरण्यात आली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवजयंती म्हटलं की, छत्रपती शिवरायांच्या लढायांचा इतिहास सांगितला जातो. लढाया आणि किल्ले यापुढे शिवराय आम्हाला कधी समजले नाहीत. समाजात शिवरायांच्या विचारांना प्रेरणा देणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वनसंवर्धनाची विश्वविक्रमी प्रतिमा साकारण्याचा संकल्प वाशी येथे पूर्ण केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्ववंदनीय राजकीय, सामाजिक, वैचारिक स्वराज्याच्या संकल्पनेला वाव मिळावा. शिवरायांच्या स्वराज्याच्या निमित्ताने संकल्पनेचा महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात 9 वी आणि 10 वी वर्गाच्या पुस्तकातुन इतिहास विद्यार्थ्यांना अनुभवता यावा. यातूनच नवीन पिढीला प्रेरणा मिळेल. महाराष्ट्र शिक्षण विभागाने जे जिजाऊंच्या संस्कारांचे धडे छत्रपतींना मिळाले त्या धडयांची पुनःआवृत्ती व्हावी असा उद्देश ही प्रतिमा साकारण्यामागे आहे.