Coronavirus : कनिका कपूरच्या पार्टीत सहभागी झालेल्या वसुंधरा राजेंची ‘कोरोना’ टेस्ट निगेटिव्ह

जयपुर : वृत्तसंस्था – देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून त्यावर सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. अशातच बॉलिवूड गायिका कनिका कपूर शुक्रवारी लंडनवरून लखनऊ येथे आली आहे. तिने दिलेल्या पंचतारांकीत हॉटेलमधील पार्टीमध्ये अनेक राजकीय नेते आणि अधिकारी सहभागी झाले होते. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या देखील कनिका कपूरच्या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. कनिका कपूरला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर वसुंधरा राजे यांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली असून रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

कनिका कपूरला कोरोना संसर्ग झाल्यानंतर तिचे विलगीकरण करण्यात आले आहे. तर तिच्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या वसुंधरा यांचा रिपोर्ट निगिटीव्ह आला आहे. या पार्टीमध्ये त्यांचा मुलगा दुष्यंत हा देखील सहभागी झाला होता. त्याने स्वत:हून घरात ‘क्वारंटाइन’ होण्याचा निर्णय घेतला आहे.

वसुंधरा राजे यांनी शुक्रवारी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी, काही दिवसांपूर्वी मी दुष्यंत याच्या सासरच्यांबरोबर लखनऊ येथे जेवणासाठी गेलो होते. कोरोनाचा संसर्ग झालेली कनिका कपूर देखील त्या डिनरसाठी पाहुणी म्हणून उपस्थित होती. खबरदारी म्हणून मी आणि दुष्यंत स्वत: हून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आवश्यक त्या सर्व सूचना पाळत आहोत, असे त्यांनी ट्विट करून माहिती दिली होती.

दरम्यान, कनिका कपूरला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आल्यानंतर वसुधरा राजे, दुष्यंत सिंह, उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह, हे कनिकासोबत असल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर वरुण गांधी, डेरेक ओब्रायन आणि संजय सिंग यांच्यासह अनेक खासदारांनी स्वत: ‘क्वारंटाइन’ झाले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी कनिका कपूर विरोधात संवेदनशील माहिती लवपल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.