३० हजार रुपयाची लाच मागणाऱ्या पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वावी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अजित किशोर जगधने याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

अजित जगधने हे नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्य़रत आहेत. तक्रारदार यांच्याविरुद्ध वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वावी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अडागळे यांना गुन्ह्यात मदत करण्यास सांगण्यासाठी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची लाच जगधने याने मागितली. तक्रारदार यांनी २८ मार्च २०१९ रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्य़ालयात तक्रार दिली होती. पथकाने तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीमध्ये जगधने याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. जगधने याने लाच स्विकारण्याचा प्रतत्न केला. मात्र त्याला संशय आल्याने लाच स्विकारली नाही.

जगधने याने लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक डी. टी. धोंडगे करीत आहेत.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.