वापरलेला कुर्ता मुलुंड टोल नाक्याजवळ वाझेंनी जाळल्याचा संशय अन् ‘ती’ स्कॉर्पिओ…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस सापडलेली स्कॉर्पिओ प्रकरणाच्या तपासात एनआयएला मिळालेल्या तसेच समोर आलेल्या बाबीवर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. त्यातूनच मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सचिन वाझेंनी स्कॉर्पिओ पार्क केल्याचा संशय व्यक्त केला असून त्या अनुषंगाने एनआयएकडून तपास सुरु आहे.

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हि स्कॉर्पिओ असल्याचे तपासात स्पष्ट झाले त्याचबरोबर विक्रोळी पोलीस ठाण्यात त्यांनी ७ फेब्रुवारीला ही कार चोरी झाल्याची तक्रार दाखल केली मात्र प्रत्यक्षात कारचोरी झालीच नव्हती असे तपासात स्पष्ट झाले. हिरेन यांचे मित्र वाझेंनी हि कार १७ फेब्रुवारीपासून लपवून ठेवली. त्यानंतर वाझेने २५ फेब्रुवारीला ही कार स्वतः चालवत मायकल रोडपर्यंत आणली आणि आधीच ठरवून ठेवलेल्या ठिकाणी उभी केली. तेथून निघण्यासाठी या कार सोबत इनोव्हा ठेवली होती. ठरलेल्या ठिकाणी स्कॉर्पिओ उभी केल्यानंतर वाझे या इनोव्हा कारमध्ये बसून निघून गेला. त्यानंतर वाझे दोन तासांनी त्या ठिकाणी पुन्हा आला. यावेळी त्याने कोणी ओळखू नये म्हणून कुर्ता परिधान केला होता.

वाझे स्कॉर्पिओ न्याहाळून पुन्हा माघारी फिरला. त्यानंतर तो कुर्ता मुलुंड टाेल नाक्याजवळ जाळला, असा घटनाक्रम घडला असावा, असे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.

तपासात एनआयएला अनेक बाबी समोर आल्या आहेत त्यावरून काही संशय व्यक्त करण्यात आले असून त्याबाबत खातरजमा सुरू असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, वाझेच्या पथकाला शासकीय वापरासाठी देण्यात आलेल्या इनोव्हा कारचा या प्रकरणात वापर केल्याचे तपासात समाेर आल्याचे समजते. पोलीस आयुक्तालयात ही कार उभी करण्यात आली. तसेच त्यावरील नंबर प्लेट बदलण्यात आली. हि कार एनआयएने मुंबई पोलिसांच्या एमटी विभागातून जप्त केली. वाझेच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे कारण तपासामध्ये वाझेकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती असल्याचे समोर येत आहे त्यामुळे या मालमत्तेबाबत ईडीकडून चौकशी होऊ शकते अशी माहिती ईडीच्या सूंत्रानी दिली.

एनआयए अधिकारी पोलीस आयुक्तालयात
मुंबई पोलीस आयुक्तालयात नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासह गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने चर्चा केली. नवीन आयुक्त असल्याने ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. मात्र भेटीमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.