RPI नसल्याने ‘वंचित’चा बंद अ’यशस्वी’ : रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सीएए आणि एनआरसी विरोधात वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंद पुकारला होता. या बंदला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागले. आजच्या बंदवर रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जोरदार टीका केली आहे. आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर बंद पुकारला होता. त्यात माझ्या पक्षाने सहभाग घेतला होता. त्यामुळे तो बंद यशस्वी झाला. मात्र आजच्या बंदमध्ये आमचा पाठिंबा नसल्याने हा बंद अयशस्वी ठरल्याचा दावा आठवले यांनी केला आहे.

आज वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंद पाळला होता. यावर फटकेबाजी करताना रामदास आठवले म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या बंदला अपवादात्मक ठिकाणी प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणं वगळता कोठेही बंद नव्हता. या ठिकाणचे जनजीवन सुरळीत सुरु हेते. बंदमध्ये माझ्या पक्षाचा सहभाग नव्हता. त्यामुळेच बंद अयशस्वी ठरला असल्याचा टोला रामदास आठवले यांनी लगावला.

यावेळी त्यांनी मनसेच्या हिंदुत्वावादी भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले, राज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेचे नुकसान होणार आहे. मनसेची भूमिका शिवसेनेची कोंडी करणारी आहे. प्रखर हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसेला शिवसेनेची मतं मिळू शकतात. मात्र, राज यांना या भूमिकेनंतर किती यश मिळतं हे पाहावे लागणार आहे. शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी दोन्ही काँग्रेस समोर झुकावे लागले, असा टोला त्यांनी लगावला. आता त्यांनी पक्षाचा झेंडा बदलला आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही, असेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

कोरेगाव भीमा प्रकरणात पोलिसांचा तपास योग्य
कोरेगाव भीमा हिंसा आणि एल्गार परिषदेचा काहीही संबंध नाही. पुणे पोलिसांनी तपासाचं काम चांगलं केले आहे. पण काही अधिकाऱ्यांवर आक्षेप आहेत. कुणावर अन्याय झाला असे वाटत नसले तरी राष्ट्रवादीने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तसेच शरद पवार यांची सुरक्षा कोणीही काढलेली नाही. कोणाची सुरक्षा काढायची आणि कुणाची नाही यावर अधिकारी चर्चा करतात. मुद्दाम कोणाचीही सुरक्षा काढली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like