नांदेडमध्ये भाजपा-काँग्रेसमध्ये थेट लढत ; वंचित बहुजन आघाडी ठरणार निर्णायक ?

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड) – नांदेड लोकसभा मतदार संघातून १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, युतीचे उमेदवार प्रताप पा चिखलीकर आणि आघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्यात ही थेट लढत होणार आहे. परंतु, वंचित बहुजन आघाडी निर्णायक होणार का अशी चर्चा सुरू आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. २६ मार्चला शिवसेना – भाजपा युतीचे उमेदवार प्रताप पा चिखलीकर यांनी दुपारी १२ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर त्याच्या एक दिवस अगोदर काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे प्रताप पा चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार दानवे येणार होते मात्र, तेही आले नाहीत. बबनराव लोणीकर यांच्या उपस्थित, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी खासदार खतगावकर, डॉ. देशमुख, संतुकराव हंबर्डे, राजेश पवार यांच्या उपस्थितीत प्रताप चिखलीकर यांनी फॉर्म भरला. अशोक चव्हाण फॉर्म भरल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष व उमेदवार असल्याने जाहीर सभा घेतली व जनतेस मतासाठी विनवणी केली.

विशेष म्हणजे, १६ नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी ५९ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४१ उमेदवारांनी आपले अर्ज वापस घेतले आहेत. तर ४ जणांचे अर्ज छाननीत नामंजूर (अवैध) झाले. त्यामुळे आता १४ उमेदवारांमध्ये ही लढत होणार आहे. परंतु, भाजप युतीचे उमेदवार प्रताप पा चिखलीकर आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्यात ही थेट लढत होणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांच्या मतांवर या निवडणूकीत कोणाचा विजय होणार हे अवलंबून राहणार आहे.

वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासून धनगर, लिंगायत, ओबीसी आणि एससी घटकाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न चालवला आहे. नांदेड लोकसभेचा विचार केल्यास लिंगायत, धनगर आणि मराठा मते येथे निर्णायक ठरणार आहेत. एससी आणि ओबीसी मते विजयी आघाडी मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका निभावू शकतात. त्यामुळे या सर्व घटकांना आकर्षित करण्यात प्रकाश आंबेडकर व ओवैसी यांना हळूहळू यश येताना दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व एम.आय.एम चे ओवैसी यांच्या युतीकडून प्रा. यशपाल भिंगे यांचा दि. २६ रोजी नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना, वंचीत बहुजन आघाडी यांना पाठींबा देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. आता हीच रेकॉर्डब्रेक गर्दी कॉंग्रेस – भाजपचे गणित बिघडवणार असल्याची चर्चा सध्या नांदेडात सुरु आहे.