वीर धरणाच्या विसर्गाने नीरा नदीस पुर ! ब्रिटिश कालीन जुना पुल पाण्याखाली, प्रसिद्ध दत्तमंदीरात शिरले पाणी

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन  –  नीरा खो-यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुुुधवारी (दि.१४) अतिवृष्टी झाल्याने वीर धरणात पाण्याची मोठी आवक झाली. त्यामुळे गुरूवारी (दि.१५ ) पहाटे पाच वाजता वीर धरणातून ५३ हजार ८४७ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडल्याने नीरा नदीला पूर आला.
दरम्यान, नीरा नदीवरील प्रसिद्ध दत्तमंदीर पाण्याखाली गेले होते तर नदीवरील ब्रिटिश कालीन पुलावरून पाणी वाहत होते.

गेल्या दोन दिवसांपासून नीरा खो-यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या मुसळधार
पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वीर धरणाच्या पाणी साठ्यात सतत वाढ होत गेली. त्यातच बुधवारी (दि.१५) नीरा खो-यातील भाटघर धरण क्षेत्रात – ६७ मि.मी., नीरा देवघर -८७ मि.मी., गुंजवणी ६८ मि.मी. व वीर धरण क्षेत्रात ९२ मि.मी. पाऊस पडल्याने वीर धरणात पाण्याची मोठी आवक झाली. त्यामुळे ‘वीर’च्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली . तसेच भाटघर, नीरा देवघर, वीर, गुंजवणी ही धरणे गेल्या महिनाभरापासून १०० टक्के फुल्लं झालेली आहेत. परिणामी वीर धरणातून नीरा नदीत बुधवारी सकाळपासून पाण्याचा विसर्ग वाढू लागला. गुरूवारी (दि.१५) मध्यरात्री दोन वाजता वीर धरणाच्या नऊ दरवाजातून ३२ हजार ४५९ क्युसेक्स, पहाटे साडेतीन वाजता ४५ हजार क्युसेक्स, पहाटे साडेचार वाजता ४५ हजार ७७१ क्युसेक्स, पहाटे पाच वाजता ५३ हजार ८४७ क्युसेक्सने विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आल्याने नीरा नदीवरील ब्रिटिश कालीन पुल पाण्याखाली गेला. प्रसिद्ध दत्त मंदीर ही निम्म्या पेक्षा जादा पाण्याखाली गेले होते. तसेच दत्त घाटावरील दशक्रिया विधी घाट व नीरा येथील स्मशानभुमीला देखील पाणी लागले होते.

तसेच नीरा नदी काठी असलेल्या गोपाळवस्तीत काही प्रमाणात पाणी शिरले होते. परंतू नीरा नदीतील विसर्ग कमी झाल्याने गुरूवारी दुपारी ते पाणी ओसरले होते.

दरम्यान, गुरूवारी (दि.१५) परतीच्या पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने वीर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. गुरुवारी संध्याकाळी चार वाजता भाटघर धरणातून ४ हजार क्युसेक्स, नीरा देवघर धरणातून १ हजार ७२६ क्युसेक्स व वीजगृहातुन ७५० क्युसेक्स, गुंजवणी धरणाच्या वीजगृहातुन २०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग वीर धरणात आल्याने वीर धरणाच्या सात दरवाजातून नीरा नदीत ३२ हजार ४५९ क्युसेक्स व वीजगृहातुन ८०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू असल्याची माहिती वीर धरण प्रशासनाने दिली.