पुरंदर : वीर धरणातून नीरा नदीत ४५०० क्युसेक्यने ‘विसर्ग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे वीर धरण रविवारी (दि. २८) ९३ % भरल्याने सायंकाळी साडेचारच्या सुमारास धरणाच्या एका दरवाजातुन ४५०० क्युसेक्स प्रतिसेकंदाने पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सोडण्यात आला.

नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेञात गेल्या तीन-चार दिवसांंपासून सतत पाऊस पडत असल्याने १५,००० क्युसेक्सने पाण्याची आवक वीर धरणामध्ये होत असल्याने रविवारी (दि.२८) सायंकाळी साडेचार वाजता वीर धरण ९३ % भरले. त्यामुळे वीर धरणातील पाच नंबरचा दरवाजा चार फुटाने उचलून ४५०० क्युसेक्स प्रतिसेकंदाने पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सोडण्यात आला असल्याची माहिती वीर धरण उपविभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी दिली.

वीर धरणात आणखी पाण्याची आवक वाढल्यास आवश्यकतेनुसार आणखी जादा पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सोडण्यात येणार असून नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याचे वीर धरणाचे शाखा अभियंता धनंजय देशपांडे यांनी सांगितले. तसेच नीरा उजव्या कालव्यात पुर्ण क्षमतेने म्हणजेच १५५० क्युसेक्सने व नीरा डाव्या कालव्यात ६०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा खात्याच्या सुत्रांनी दिली.

दरम्यान गत वर्षी २२ जुलैला वीर धरण ९७ % भरले होते . यावर्षी मात्र २८ जुलैला ९३ % च धरण भरले आहे. त्यामुळे नीरा नदीपाञात पाणी सोडण्यात आले आहे. वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याने नीरा नदी यावर्षी पहिल्यांदाच खळखळून वाहणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त