वीर धरणाच्या ५ दरवाजातून २२ हजार ९८० क्युसेक्सने नीरा नदीत विसर्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वीर धरणातून बुधवारी (दि. ३१) सायंकाळी पाच वाजता धरणाच्या पाच दरवाजातून २२ हजार ९८० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सोडण्यात आला असल्याची माहिती वीर धरण उपविभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे व शाखा अभियंता धनंजय देशपांडे यांनी दिली.
नीरा खोऱ्यातील वीर धरणाच्या पाणलोट क्षेञात मंगळवारी सायंकाळ पासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग मंगळवारी रात्री ११ वाजता
९००० क्युसेक्स पाणी कमी करण्यात आले होते. तसेच बुधवारी (दि.३१) पहाटे पाच वाजता आणखी
९००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कमी करून तीन दरवाजातून १३ हजार ५३३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला होता.

दरम्यान, बुधवारी दुपारपासून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे बुधवारी संध्याकाळी पाच दरवाजातून २२ हजार ९८० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आला. त्यामुळे पुन्हा नीरा नदी दुधडी वाहू लागली आहे. तसेच नीरा देवघर व भाटघर धरण सुमारे ८०टक्क्यांपर्यंत झाले असून ते ही भरण्याच्या मार्गावर आहे.

आरोग्यविषयक वृत्त