देशसेवा बजावताना उस्मानाबादच्या सुपुत्राला पंजाबमध्ये वीरमरण

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – पंजाबमधील पठाणकट येथे कर्तव्य बजावताना सोनारी (ता. परंडा) येथील सागर पद्माकर तोडकरी (वय 31) यांना रविवारी (दि. 14) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वीरमरण प्राप्त झाले. ही वार्ता गावात येऊ धडकली आणि परिसरात शोककळा पसरली. शहीद जवान तोडकरी यांचे पार्थिव मंगळवारी (दि. 16) सकाळी 10 वाजता पुणे त्यानंतर दुपारी दोन वाजता सोनारी या गावी दाखल होणार आहे. गस्तीवर असताना वाहनास अपघात होऊन त्यांना वीरमरण प्राप्त झाले. तोडकरी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

शहीद जवान सागर तोडकरी यांचे प्राथमिक शिक्षण सोनारीतील जि. प. प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण परंडा येथील महात्मा गांधी विद्यालयातून पूर्ण केले. रा. गे. शिंदे महाविद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. तर बार्शी येथून बीसीएचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तयारी केली असता, 2010 मध्ये ते सैन्य दलात दाखल झाले. नागपुरातील कामटी येथून ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना 15 कार्ड बटालीयनमध्ये पदस्थापना मिळाली. यानंतर प्रारंभी त्यांनी अहमदनगर, पंजाब, जम्मू काश्मीर येथे सेवा बजावल्यानंतर सध्या ते पंजाबमधील पठाणकोट येथे कार्यरत होते.