वीरपत्नी रसुलन बीबी यांना ‘यशोदा’ पुरस्कार जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक दीपक मानकर यांच्या मातोश्री स्व. सौ. मालतीताई माधवराव मानकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘यशोदा’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा हा पुरस्कार परमवीर चक्र विजेते शहीद अब्दुल हमीद यांच्या वीरपत्नी रसुलन बीबी यांना देण्यात येणार असल्याची माहिती, माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी वीर हनुमान मंडळाचे संस्थापक दत्ता सागरे, दीवा प्रतिष्ठानचे संस्थापक हर्षवर्धन मानकर, अध्यक्ष करण मानकर आदी उपस्थित होते.

दीपक मानकर म्हणाले की, दीवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्र मंडळाच्या वतीने हा पुरस्कार मागील तीन वर्षांपासून दिला जात आहे. हा पुरस्कार सोहळा शनिवारी (दि.५) साडेचार वाजण्याच्या सुमारास बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पार पडणार आहे. हा पुरस्कार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. मानाची साडी, मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि पाच लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.

ज्येष्ठ उद्योजक विठ्ठलशेठ मनियार, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, इस्लामचे अभ्यासक अनिस चिश्‍ती, ब्रिगेडीयर प्रसाद जोशी, शहीद अब्दुल हमीद यांचे नातू जमील आलम या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

पुरस्काराचे हे तीसरे वर्षे असून वीर पत्नीला हा पुरस्कार देताना अतिशय आनंद होत असून भविष्यात सैनिकांच्या कुटुंबियांनाच हा पुरस्कार देण्याबाबत संस्थेचा भर राहणार असल्याचे दिपक मानकर यांनी यावेळी सांगितले.