संकटात असलेल्या ‘या’ अभिनेत्रीची भाईजान सलमानकडे मदतीसाठी धाव

पोलीसनामा ऑनलाईन टीम : लॉकडाउनमुळे उद्योग-धंदे बंद असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्येच अभिनेता सलमान खानच्या ‘वीरगती’ या चित्रपटात झळकलेल्या पूजा डडवाल या अभिनेत्रीवरही आर्थिक संकट ओढावले आहे. तिने पुन्हा एकदा सलमान खानकडे मदतीची मागणी केली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याचे सांगत तिने प्रकृतीही ढासळल्याचेही सांगितले आहे.
काही आठवड्यापूर्वी माझी तब्येत अचानक बिघडली. सगळ्यात पहिले मला खोकला झाला आणि त्यानंतर ताप आला. गेल्या कित्येक दिवसांपासून माझी प्रकृती अशीच खराब झाली आहे.

सध्या गोव्यातील वातावरणात गारवा आहे. त्यामुळे कदाचित वातावरणातील या बदलामुळे मला हा त्रास होत असेल. अनेकांनी मला कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले आहे. पण चाचणी करण्याइतपतदेखील पैसे माझ्या जवळ नाहीत. सध्या मी माझ्या गोव्यातील घरी आहे. मात्र माझी प्रकृती आणि आर्थिक स्थिती दोन्ही बिकट आहेत. माझ्याकडे घरातील गरजेचे सामना घेण्यापूरतेही पैसे नाहीत. यापूर्वी मी काही मित्र-मैत्रिणींकडून 500- हजार रुपये उधार घेतले आहेत.

मात्र आता तेदेखील मदत करण्यास नकार देत आहेत. यापूर्वी मी आजारी असताना सलमान खानने मला मदत केली होती. मुंबईतील रुग्णालयात मी 6-7 महिने असताना त्याने माझ्या उपचारांचा खर्च केला होता. त्यामुळे आज पुन्हा एकदा या संकटकाळात मला सलमान खानची आठवण येत आहे. सारखं-सारखं सलमानकडून मदत मागणे मला योग्य वाटत नाही. परंतु सलमान व्यतिरिक्त अन्य कोणीही मदत करायला तयार होणार नाही. त्यामुळे सलमान मी परत एकदा संकटात आहे. कृपया माझी मदत कर.