महाराष्ट्राच्या सुपुत्राला लेहमध्ये विरमरण, बार्शी तालुक्यातील वाघाचीवाडीचा सुपुत्र शहीद

बार्शी/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – काश्मिरमधील लेहहून कारगिलकडे जात असताना झालेल्या अपघातात बार्शी तालुक्यातील वाघाचीवाडी येथील सुपुत्राला विरमरण प्राप्त झाले. काश्मिरमधील लेह येथे भारतीय सैन्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या भास्कर सोमनाथ वाघ असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. भास्कर वाघ यांना वयाच्या 39 व्या वर्षी विरमरण आले.

भास्कर वाघ हे 14 जुलै 2000 मध्ये सैन्यात भरती झाले आहेत. सध्या ते लेह युनिट क्रमांक 137 मध्ये हवालदार म्हणून देशसेवा करत होते. मंगळवारी (दि.14) सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या चार सहकारी सैन्यांसोबत कारगिलकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात वाघ हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाघ यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांना बुधवारी (दि.15) वीरमरण प्राप्त झाले.

भास्कर वाघ यांनी मिलटरी प्रशिक्षण केंद्रात लष्करी प्रशिक्षण घेतले होते. वाघ यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण बार्शीत झाले. झाडबुके महाविद्यालयात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्याची माहिती, गावच्या पोलीस पाटलांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 11 व 13 वर्षाच्या दोन मुली, 2 वर्षाचा मुलगा असल्याची माहिती त्यांच्या भावाने दिली.

भास्कर वाघ यांचा मृतदेह लष्कराच्या विमानाने गुरुवारी (दि.16) सायंकाळी पुणे येथे आणण्यात येणार आहे. तेथून वाहनाने त्यांच्या गावी वाघाचीवाडी येथे नेण्यात येणार आहे. अशी माहिती नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांनी दिली.