राज्यावर भाजीटंचाईचे संकट, बाजार बंद

नवी मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – ई-नाम प्रणाली कायद्याचा निषेध करण्यासह सरकारने व्यापारी तसेच माथाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी एपीएमसी येथील भाजी बाजार बंद ठेवण्यात आले. या लाक्षणिक संपाची तीव्रता आता बेमुदत संपापर्यंत वाढल्याने राज्यासमोर आजपासून भाजीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या पणन, कामगार व अन्य विभागांकडून घेण्यात आलेल्या नव्या नियमांमुळे बाजार समित्यांतील सुरक्षारक्षक, माथाडी कामगारांना फटका बसणार असल्याने त्याविरोधात राज्यातील बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

ओतूर, नाशिक, जुन्नर, पालघर, पुणे येथून मुंबईत दाखल होणारा भाजीमालही गुरुवारपासून बंद होण्याची शक्यता आहे. या भागांतील बाजारही गुरुवारपासून बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई व्यतिरिक्त ज्या ठिकाणांहून भाजीपाला, मसाले तसेच इतर जिन्नसांचा पुरवठा होतो, तोही उद्यापासून बंद होणार आहे. त्यामुळे साठवणुकीतील उपलब्ध भाज्यांसाठीही दर कडाडतील, अशी शक्यता आहे.

काल या बंदमुळे परराज्यातून मुंबईकडे भाज्या घेऊन निघालेली वाहने काही ठिकाणी खोळंबून राहिली, तर काही जणांनी मार्गातील अन्य मोठ्या बाजारांकडे मोर्चा वळवला. बाजार खुले झाल्यापासून मुंबईमध्ये भाजीमालाच्या गाड्या थेट आल्या. त्यामुळे ३० टक्के मालाच्या गाड्या थेट मुंबईत येत आहेत. तरीही आजपासून भाजीपाल्याची मागणी पूर्ण करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आजपासून किरकोळ बाजारात भाजीपाल्याची टंचाई भासणार आहे.

परराज्यांमधून येणारा माल संबंधित विक्रेत्यांनी नवी मुंबई तसेच मुंबई बाजाराचा अंदाज घेऊन इतरत्र वळवला आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून सिमला मिरची, हिरवा वाटाणा, गाजर, घेवडा, टोमॅटो, बिट, गवार या भाज्यांचा पुरवठा घाऊक बाजारात झाला नाही.

व्यापारी आणि माथाडी कामगारांनी पुकारलेला लाक्षणिक बंद आता बेमुदत बंद म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आजही प्रमुख बाजार बंद राहणार आहेत. बंदमुळे व्यापाऱ्यांनीही भाजीपाला मागवला नाही. त्यामुळे घाऊक बाजारातून मुंबई आणि उपनगरातील पुरवठा जवळपास रोखला गेला होता. त्यातच आजही बाजार बंद राहणार असल्याने भाजीपाल्याची टंचाई निर्माण होऊन दरवाढ होण्याची चिन्हे आहेत.

सिंचन घोटाळ्यास अजित पवारच जबाबदार; एसीबीचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र