पुण्यातील मार्केटयार्डातील भाजीपाला बाजार 2 महिन्यांनंतर सुरु

पुणे : व्यापार्‍यांना कोरोनाचा लागण झाल्याने गेल्या २ महिन्यांपासून बंद असलेला भाजीपाला बाजार रविवारी सकाळपासून सुरु झाला आहे. बाजारात एका दिवशी फक्त ५० टक्के आडत्यांना कामाची परवानगी देण्यात आली असून प्रत्येक आडत्याला केवळ एकच गाडी बोलविण्याची परवानगी दिली गेली आहे.

मार्केटयार्ड परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने तसेच कामगार व टेम्पो संघटनांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने गेल्या २ महिन्यांपासून मार्केटयार्डमधील भाजीपाला बाजार बंद होता. बाजार सुरु करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत निर्णय झाला होता. त्यानुसार शनिवारी संपूर्ण बाजारात साफ सफाई करण्यात आली. भाजी बाजारात सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. त्यानंतर रविवारीपासून भाजी बाजारातील खरेदी विक्री सुरु झाली आहे. बाजारात आज २०० गाड्यांमधून सुमारे १५ हजार क्विटल मालाची आवक झाली.

बाजारात एक दिवसाआड आडत्यांना व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आज एका बाजूच्या आडत्यांना परवानगी देण्यात आली होती. उद्या दुसर्‍या बाजूच्या आडत्यांना परवानगी देण्यात येणार आहे. बाजारात येताना सर्वांना सॅनिटायझर वापर करणे व शारिरीक तापमान तपासणे बंधनकारक करण्यात आले आहे.